ठाणे : ग्रामीण भागातील मुलांमध्ये कलात्मक दृष्टिकोन आणि कलेबद्दल आसक्ती आहे. मात्र, त्यांना मंच मिळत नाही. हा मंच मिळवून देण्यासाठीच ‘ कलासिद्धी’ मुंबई आणि ‘अर्थ’ स्टुडिओ, संगम, मुरबाड – यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची मोफत कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषद केंद्र शाळा, अस्कोट, संगम, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत पहिली ते आठवीतील जवळपास 103 विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्र शाळेतील सुदर्शन पाटील, महेश शिंदे व मेघा पवार असे सर्व शिक्षकांचे आणि शाळेचे विश्वस्त सुरेश ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य या कार्यशाळेला लाभले.
शालेय स्तरावर अशा प्रकारची कार्यशाळा प्रथमच या विभागात आयोजित करण्यात आली होती. खास या कार्यशाळेसाठी मुंबईहून कलासिद्धी या संस्थेतर्फे अरुण आंबेरकर, उदय पटवर्धन, रेखा भिवंडीकर आणि अनिल लोंढे अशी नामांकित चित्रकार व शिल्पकार मंडळी, तर अर्थ स्टुडिओ तर्फे सुनील पुजारी (चित्रकार) हे सहभागी झाले होते.
या सर्वांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या कार्यशाळेदरम्यान केले, सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता, विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि सुबक अशा गणेश मूर्ती घडविल्या, गणेश मूर्ती घडविण्यात विद्यार्थी एवढे रंगून गेले होते की कार्यशाळेचे चार तास केव्हा संपले हेही त्यांना कळले नाही.
सुंदर गणेश मूर्ती घडविणाऱ्या प्रथम दहा विद्यार्थ्यांचे रोख रक्कम बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पिडिलाइट या कंपनीचा चित्रकला साहित्याचा संच श्रीमती आश्लेषा शिरोडकर, मुंबई, यांच्यातर्फे देण्यात आला.
कलासिद्धीचे अरुण आंबेरकर आणि सुनील पुजारी यांनी, अशाच कार्यशाळातून उद्याचे नवनवीन कलाकार निर्माण होतील असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले, बक्षीस समारंभाने या सुंदर आणि कलात्मक कार्यशाळेची सांगता झाली.
