ठाणे : ठाणे शहरात विशेषतः घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बॅनरबाजी केली जात आहे. त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावले यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. बेकायदेशीर बॅनरबाजी करणाऱ्यांना दंड आकारून ठाणे महानगर पालिकेच्या महसुलात भर टाकावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावले यांनी या संदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. ठाणे शहरातील घोडबंदर भागात अनेक माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी तर कृत्रिम तलावांच्या सभोवताली बॅनरबाजी करून गणेश विसर्जनासाठी आपणच व्यवस्था केली असल्याचे दाखवून पालिकेचे काम स्वतःच्या नावावर खपवले आहे. शिवाय, शहरभर बॅनर लावून ठाणे महानगर पालिकेचे जाहिरात धोरण धुळीस मिळविले आहे. ही बाब अत्यंत चुकीची असल्याने आपण या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून संबधित माजी नगरसेवकास दंड आकारावा आणि ठामपाच्या महसुलात वाढ करावी; अन्यथा, आपण कोकण आयुक्तांसमोर उपोषणाला बसू, असा इशारा अशोक सोनावले यांनी दिला आहे.
