ठाणे : ‘प्रोजेक्ट दिशा’ या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने शिकतील यासाठी कामकाज करावे. विविध उपक्रम राबवताना तांत्रिकदृष्ट्या मदत घेत आत्मीयतेने तळमळीने शिक्षकांनी काम करावे, असे मार्गदर्शन शिक्षण परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शिक्षकांना केले.
या विविध उपाययोजना करून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी मोलाची कामगिरी करावी, अशी अपेक्षा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली. मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत प्रोजेक्ट दिशा व्ही स्कूल पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या वतीने प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषद बी. जे. हायस्कूल, ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद शनिधारी घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत तसेच विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्ययन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितुले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उप शिक्षणाधिकारी कुंदा पंडीत, उप शिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व विस्तार अधिकारी शिक्षण, सर्व समन्वयक व्यवस्थापन, सर्व केंद्र प्रमुख व मोठ्या संख्येने शिक्षक उपलब्ध होते. विद्यार्थ्यांना १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण उत्तम पद्धतीने देणे गरजेचे आहे यासाठी १०० टक्के शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन डायटचे प्राचार्य संजय वाघ यांनी केले. शिक्षण विभागातील विविध कामासंदर्भात तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना वाचन, लेखन‌ व गणित जलदगतीने करता यावे व शिक्षण क्षेत्रात बदल व्हावा यासाठी शिक्षण परिषद घेण्यात येत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी शिक्षकांनी गांभीर्याने कामकाज करावे, असे प्रास्ताविकेत उप शिक्षणाधिकारी कुंदा पंडीत यांनी सांगितले. VOPA (ओवेल्स ऑफ पीपल असोसिएशन) या सामाजिक संस्थेच्या मदतीने व्ही स्कूल पोर्टलच्या माध्यमातून अध्ययन स्तर निश्चिती करणे याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला असून तांत्रिक दृष्ट्या या अभियानासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षक यांनी मराठी, गणित, इंग्रजी विषय शाळेत शिकवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांच्या अक्षर ओळख करून देण्यासाठी विविध पध्दतीचे अंमलबजावणी करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली.‌ दिशा प्रकल्पाने माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिक्षा मिळाली, असे वर्गशिक्षक यांनी मत व्यक्त केले.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *