ठाणे
कार्यकर्ता म्हणून एक समर्पित जीवन जगलेले अवलिया मोहन सकपाळ यांच्या स्मरणार्थ स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला. जीवराज सावंत यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. तो स्मृतिग्रंथ न राहता संदर्भ ग्रंथ व्हावा. सद्यपरिस्थितीतील समाजातील विविध प्रश्नांचा या ग्रंथात ऊहापोह करण्यात आला आहे. त्याला सूचक असे `धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ शीर्षक देण्यात आले आहे. ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयात या ग्रंथाचे प्रकाशन साथी सुरेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उपस्थित पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन मोहन सकपाळ मित्र परिवाराचे प्रकाश सरस्वती गणपत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वत्ते सुरेश सावंत, विजय तांबे, संजय मं. गो., पुस्तकाचे संपादक जीवराज सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीता साने, अर्चना सकपाळ या मान्यवरांचे जवाहर नागोरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला `मोहन सकपाळ’, `स्मृतिग्रंथ धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ या ग्रंथाचे संपादक जीवराज सावंत यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे सुरेश सावंत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सुरेश सावंत यांनी मोहन सकपाळ यांच्या आठवणी सांगत त्यांच्या उक्ती आणि कृती, त्यांचे कृतिशील आचार-विचार यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. समाजकारण, राजकारणाबरोबर गाव ते देशपातळीवर विविध प्रश्नांच्या संदर्भात मोहन सकपाळ यांचे विचार त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. विजय तांबे यांनी देशातील सध्या भेडसावणारी बेरोजगारीची समस्या, इथली अर्थव्यवस्था यासंदर्भात आपले विचार मांडले. आपल्या देशाचा जीडीपी वाढत आहे. रोजगार झपाट्याने कमी होत आहे. मानवाच्या श्रमाची समाजाला गरज नसेल तर युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा पर्याय सुचविण्यात आला. अशा विविध विषयांवर त्यांनी या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने विचार मांडले. साथी संजय मं. गो. यांनी कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष चळवळीतील सहभाग किती? आणि कसा असावा? याबाबत विचार मांडले. नाही तर आपण कायम असा प्रश्नांचा धांडोळा घेत राहू. त्यासाठी समाजकारणात, सध्याच्या आघाडीच्या राजकारणात आपण कोणाच्या बाजूने उभे राहावे? याबाबतची आपली भूमिका स्पष्ट असावी, असा एक विचार मांडला. त्यासाठी जास्तीत जास्त कृतिशील कार्यकत्यांचा सहभाग वाढायला हवा?, असे ते म्हणाले. मोहन सकपाळ यांची पत्नी अर्चना सकपाळ यांनी पती आणि कार्यकर्ता म्हणून मोहन सकपाळ यांच्या आठवणी जागवल्या. त्यांनी प्रत्यक्ष जीवनात स्त्री-पुरुष समानता, आपले पुरोगामी विचार अंमलात आणले. एक निस्पृह कार्यकर्ता म्हणून त्यांनी मोहन सकपाळ यांचे वेगळेपण श्रोत्यांसमोर मांडले.कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीता साने यांनी संजीव साने व मोहन सकपाळ यांसारख्या कार्यकर्त्यांची समाजासाठी पूर्णत्वाने झोकून देण्याची समर्पित वृत्ती, स्वत: च्या आजारपणात देखील किती सजग होती, हे स्वानुभवाने मांडले. मुंबई उच्च न्यायालयाकडून सिनियर ॲडव्होकेट म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल सदर कार्यक्रमात सेवा दलाच्या आणि सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या ॲड.नीता कर्णिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सुहास कोते यांनी उपस्थित श्रोते, पाहुणे, वत्ते यांचे आभार मानले. या स्मृतिग्रंथासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य त्यांचे आभार मानले. याव्यतिरिक्त या ग्रंथाचे मुखपृष्ठकार निलेश बि +, रेखाचित्रकार शरद जोशी, अक्षर जुळवणी करणारे, मुद्रक, मुंबई आकाशवाणीचे वृत्तनिवेदक, प्रफू तपासून देणारे स्मृतिग्रंथासाठी आणि आरोग्य कार्यकर्ता निधी जमा करून देणारे कार्यकर्ते, स्मृतिग्रंथासाठी लेखन करणारे लेखक यांचे आभार मानते. त्यांचा योग्य तो यथोचित सत्कार करण्यात आला.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *