‘ बहुजन संग्राम ‘ चा सवाल

 

मुंबई : राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून दोनच महिन्यांत महाराष्ट्र सरकारला त्या नकोशा झाल्या आहेत काय, असा सवाल बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी आज केला.
सुजाता सैनिक या पंजाबातील दलित समाजातील आहेत. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात दलित विद्यार्थ्यांची जी एक तुकडी पाठवली होती, त्यातील सी. डी. चिमा यांच्या घराण्यातील सुजाता सौनिक आहेत, याची त्यांनी एका पत्रकाद्वारे आठवण करून दिली आहे.
सौनिक यांना हटविण्याच्या हालचालींमुळे शिंदे – फडणवीस – अजितदादा यांच्या सरकारचा दलितद्वेष्टा जातीयवादी चेहरा उघडा पडला आहे, असे चिलगावकर यांनी म्हटले आहे.
शिंदे सरकार सध्या ‘ लाडकी बहिण ‘ असे संबोधत महिला वर्गाचे सध्या लांगूलचालन करत आहे. त्यामागे विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे निव्वळ राजकारण आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारचा महीलांबद्दलचा कळवळा नकली आहे, हेच सुजाता सौनिक यांना हटविण्याच्या हालचाली सांगत आहेत, असा आरोप चिलगावकर यांनी केला आहे.
गृह खात्यातील विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव आय.एस. चहल यांची मुख्य सचिव पदी वर्णी लावण्यासाठीच शिंदे सरकारने सुजाता सौनिक यांना हटवण्याचे पाऊल उचलले आहे. त्यांचा कार्यकाल पुढील वर्षी जूनमध्ये संपणार आहे. त्यापूर्वी सौनिक यांना हटवण्यात आल्यास शिंदे सरकारला दलितांच्या रोषाला आणि उग्र प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागेल, असा इशारा बहुजन संग्रामच्या पत्रकाच्या शेवटी चिलगावकर यांनी दिला आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *