कल्याण : गणशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. परंतु, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. या खड्डे मार्गातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आठ ते दहा फूट उंचीचा गणपती नेताना मोठी कसरत करावी लागते. संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी येण्याच्या वेळेत मंडळे गणपती आगमन मिरवणुका काढत असल्याने कल्याण, डोंबिवली शहरे गेल्या आठवड्यापासून वाहन कोंडीत अडकत आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रात्री साडे अकरा ते पहाटेच्या वेळेत आपले गणपती मखरात नेण्याची सूचना पालिका, पोलीस अधिकारी, जाणकार नागरिकांनी मंडळांना केल्या आहेत. परंतु, आपल्या गणपतीचे झगमगाटी रूप नागरिकांना अगोदरच पाहता यावे यासाठी गणेशोत्सव मंडळे संध्याकाळच्या वेळेत शहरातून गणपती आगमन मिरवणुका काढत आहेत.
