अनिल ठाणेकर
ठाणे : भारतीय तिरंदाजाचे कौशल्य वाढविण्यासाठी तिरंदाजीत भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात यश मिळवून देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे ३० कोटी रुपये खर्चून ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रासाठी महानगरपालिकेच्या रिक्रिएशन ग्राऊंडच्या आरक्षित भूखंडावर दामजी शामजी या विकासकांकडून सुमारे १० कोटी रुपये खर्च करून आपण हे प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. महापालिकेकडून यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून हे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र साकार होत असून ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर एमएमआरडीए क्षेत्रातील हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी व खेळाडूंच्या पालकांना तिरदांजी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केल्याने सातत्याने पाठपुरावा करुन हे प्रशिक्षण केंद्र आता सुरू होत आहे. १ सप्टेंबर रोजी हे प्रशिक्षण केंद्र ठाणेकरांच्या सेवेत आले. या प्रशिक्षण केंद्राचा फायदा फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्व करणारे खेळाडूच नव्हे तर देशातील प्रतिनिधीत्व करणारे या केंद्रातून घडतील. भविष्यात या केंद्रातून ऑलिम्पिकमध्ये खेळाडू जाऊ शकतील. हे तिरंदाजी केंद्र आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. विद्यार्थांचे कौशल्य विकसित होईल व त्यांची खेळामधील रूची वाढेल. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. या हेतूने हे प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र साकारण्यात येत आहे. या ठिकाणी ३० मीटर आणि ७० मीटर (ऑलिम्पिक रेंज) रेंज तयार करण्यात आल्या आहेत. सरावासाठी डोमची सुविधा आहे. कॉन्फरन्स रुम, स्टोअर रुम, जिम आदी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. राज्यातील पुणे, सातारा, संभाजीनगर, नाशिक येथे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रे आहेत. तिरंदाजीमध्ये जगज्जेती ठरलेले आदिती स्वामी, ओजस देवतळे यांनी साताऱ्याच्या अकादमीतून प्रशिक्षण घेतले. २०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी नेत्रदीपक कामगिरी केली. साताऱ्यातील प्रविण जाधव याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व केले. तिरंदाजी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना शहरातच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र उपलब्ध झाले तर त्यांच्यातील कौशल्य जलदगतीने विकसित होईल. राज्यातील तिरंदाज खेळाडूंना सर्वोत्तम व्यासपीठ मिळावे यासाठी ठाण्यात पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र स्थापना करण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रातून उत्तम तिरंदाज घडून आपल्या देशाचे नाव ते उज्ज्वल करतील, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
