मुंबई : एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज संप पुकारण्यात आला आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.

राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. इतर आगारांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः काम सुरू आहे. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही. परंतु, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही. परंतु, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने एसटीला प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दर्शवला असून ४,९५३ जादा बस आतापर्यंत पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे हे धरणे आंदोलन संपले नाही तर ऐन गणेशोत्सवात गावी निघणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो.

संपात शरद पवार उद्धव ठाकरेंची पिलावळ – सदावर्ते

मुंबई: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या  पिलावळांनी हा संप पुकारलाय अशी, टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मविआ सरकारच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार होता. मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेनं हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. आम्ही ६५ हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतो, आमदार पडळकर, पावसकर यांच्या संघटना या संपात उतरल्या नाहीत, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *