मुंबई : महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
‘महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा’ निमित्त विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ‘ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्रीमती मुर्मू बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. वीरमाता जिजाऊ यांची धरती असलेल्या आणि स्त्री शिक्षणाची सुरवात करणारे महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, संसदीय लोकशाहीवर मार्गक्रमण करत असेलल्या भारताला घटना देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यासारख्या महान विभूतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकमहोत्सव साजरा होत असल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेचे, लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करुन राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, विधान परिषद सभागृहाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक दिशादर्शक नियम, कायदे यांची निर्मिती केली आहे. जे पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वि.स.पागे यांनी दिलेला रोजगार हमी योजनेसारखा लोकोपयुक्त कायदा ही याच विधीमंडळाची देण आहे. देशाच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग.वा.मावळणकर हे याच विधान परिषदेचे सदस्य होते तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही याच विधीमंडळाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्यासोबतच लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधीमंडळ काम करत आहे. या माध्यमातून जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे सांगून विधान परिषदेच्या शतकपूर्तीच्या वाटचालीचा आढावा घेणारा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केल्याबदद्ल तसेच या ग्रंथात तत्कालीन बॉम्बे विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती श्रीमती जेठी सिपाहीमलानी यांच्यावर सविस्तर माहिती देणारे प्रकरण ठेवल्या बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी केलं.
