एकाच बाईचे २७ वेगवेगळे फोटो वापरून बोगस अर्जाव्दारे पैसे लाटले

पनवेल : पनवेलमध्ये एका भामट्याने एकाच महिलेचा वेगवेगळ्या पोशाखातील फोटो वापरत तब्बल तिला २७ वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून चित्रित करीत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  खारघरच्या रहिवासी पूजा महामुनी या महिलेचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे तिने याबाबत पनवेल शहरातील माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांना २८ ऑगस्ट रोजी सांगितलं. नीलेश बाविस्कर यांनी चौकशी केली असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच स्वीकारला गेल्याचं स्पष्ट झालं. तसा त्यांच्या मोबाईलवर मेसेजही आला होता. बाविस्कर यांनी या प्ररकणाची चौकशी केल्यानंतर या अर्जात नमूद केलेला क्रमांक त्यांना मिळाला. या एकाच नंबरवर तब्बल ३० लाभार्थी लिंक असल्याचंही आढळलं. या बाबत पनवेल तहसील कार्यालयात तक्रार करून योग्य कारवाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारने आता हे अर्ज भरण्याकरता मुदतही वाढवली आहे. दोन कोटीहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून अनेक महिलांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. परंतु, अजूनही काही महिला अर्ज स्वीकारण्याच्याच प्रतिक्षेत आहेत.

सातारा जिल्ह्यात तर एका व्यक्तीने ३० जणांच्या आधार कार्डचा गैरवापर करून तब्बल ३० अर्ज भरले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी २६ खात्यांत पैसेही जमा झाले आहेत.

दरम्यान, तुमचाही अर्ज वारंवार स्वीकारला जात नसेल किंवा दीर्घकाळ स्वीकारण्याच्या प्रतिक्षेत असेल तर तुम्हीही तत्काळ याबाबतची चौकशी करा. आधार कार्डचा गैरवापर करून अशा पद्धतीने सरकारी योजना लाटण्याचा हा प्रकार जुना असून इतर महिलांनीही याबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसंच, लाडकी बहीण योजनेसाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबत राज्य शासनाने नवा जीआरच काढला आहे. अनेक महिला विविध कारणामुळे अर्ज करू शकल्या नसल्याने त्यांनी त्वरीत हे अर्ज भरावेत असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *