ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या नौपाडा परिमंडळात रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी या कारवाईच्या पहिल्या दिवशी वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात रस्त्यावर असलेली बेवारस लहान-मोठी १२ वाहने हटविण्यात आली.
गणरायाच्या आगमन मिरवणुकीच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
शहरांमध्ये गणेशोत्सवा दरम्यान गणपती मिरवणुकीस कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये याकरता अनेक ठिकाणी उभी असलेली बेवारस वाहने व अनधिकृत हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना अशाप्रकारे कुठे बेवारस वाहन आढळल्यास त्याची माहिती प्रभाग समिती कार्यालयात द्यावी, असे आवाहनही उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे. नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाईसाठी पथकही तयार करण्यात आल्याची माहिती पाटोळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *