केंद्र सरकार एक एप्रिल 2025 पासून देशात एकात्मिक निवृत्ती योजना लागू करणार आहे. यासोबतच एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. नवीन वेतन आयोग आणि नवीन पेन्शन प्रणालीमुळे बरेच काही बदलणार आहे. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातच नाही तर त्यांच्या पेन्शनमध्येही मोठे बदल होणार आहेत.
नवीन वेतन आयोगामध्ये वर्ग एकचा पगार 34,560 रुपये तर वर्ग 18 चा पगार 4.8 लाख रुपये असू शकतो. 2004 मध्ये नवी पेन्शन योजना लागू केली होती. तेव्हापासून कर्मचारी सातत्याने जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत होते. जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या पगारातून पेन्शनसाठी कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. नवीन पेन्शन योजनेत त्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या10 टक्के रक्कम दरमहा पेन्शनसाठी भरावी लागते. यामध्ये 14 टक्के वाटा शासनाकडून दिला जातो. याबाबतचा सगळा वाद या योगदानाचा आणि निश्चित पेन्शनचा होता. आता एकात्मिक निवृत्ती वेतन योजनेमध्ये 25 वर्षे काम करणाऱ्यांना गेल्या बारा महिन्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.
सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. पुढील आर्थिक वर्षापासून एकात्मिक निवृत्ती योजना लागू करण्यात येणार आहे. यामध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2029 पासून त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. त्यांना अर्ध्या पगाराची पेन्शन मिळवण्यासाठी 25 वर्षे सेवेमध्ये रहावे लागेल. किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी किमान दहा वर्षे सेवेमध्ये रहावे लागेल. दुसरीकडे, सातव्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते. आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 1.92 असण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 1.92 पर्यंत वाढवल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे किमान पगार सध्याच्या 18 हजार रुपयांवरून 34,560 रुपयांपर्यंत वाढू शकतो. याशिवाय कमाल पगारही 2.5 लाख रुपयांवरून 4.8 लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. किमान पेन्शन 20,736 रुपये तर कमाल पेन्शन 2,88,000 रुपये असेल. एका अहवालानुसार 2004 मध्ये भरती झालेल्या लोकांची पहिली तुकडी 2029 पर्यंत 25 वर्षांची सेवानिवृत्तीची अंतिम मुदत पूर्ण करेल. आठवा वेतन आयोग वेळेवर लागू झाल्यास चार टक्के महागाई भत्त्यानुसार 2029 पर्यंत त्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 20 टक्के होईल. अशा परिस्थितीत 34,560 रुपयांच्या पगारावर 6,912 रुपये इतका 20 टक्के महागाई भत्ता मिळून पेन्शन 20,736 रुपये होईल. त्याचप्रमाणे, 4.8 लाख रुपयांच्या पगारावर महागाई भत्ता 96,000 रुपये असेल.
