कराड : शिवसंग्राम संघटनेचे सर्वेसर्वा माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर गेली दोन वर्षे शिवसंग्राम संघटना मी टिकवून ठेवली. मात्र, मेटे कुटुंबीयांनी संघटना वाटून घेतल्याचा आरोप करीत ‘शिवसंग्राम’चे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी त्यांच्या ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.
कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित बानुगडे, अनंत देशमुख, विक्रांत आम्रे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. ‘शिवसंग्राम’च्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नसल्यानेच नवी संघटना उभारत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, की शिवसंग्राम संघटना २००१ मध्ये स्थापन झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यात संघटनेचे लाखो कार्यकर्ते आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर ही संघटना बांधून ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, अलीकडे मेटे कुटुंबीयांनीच शिवसंग्राम संघटना वाटून घेतल्याने सोबतच्या कार्यकर्त्यांसाठी ‘स्वराज्य संग्राम’ संघटनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. ही संघटना गौरवशाली ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी दिला.
