ठाणे : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन २०२४च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज सादर करावयाची मुदत दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना “काजू बी साठी शासन अनुदान देणे” या योजनेच्या अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२, कृषी खात्याचा दाखला, जी.एस.टी. बिल, बँक तपशिल, आधार कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छूक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपविभागिय कार्यालय, वाशी, नवी मुंबई व रत्नागिरी येथे संपर्क साधावा अथवा कृषी व्यवसाय पणन तज्ञ (७२१८८१७७९९) राजवर्धन कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय, रत्नागिरी, उपसरव्यवस्थापक मिलिंद ग. जोशी यांनी केले आहे.
0000
