कल्याणमधिल घरून अटक

पाच दिवसांची पोलिस कोठडी

राजन चव्हाण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधिल राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी फरार असलेला वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटेच्या मुसक्या पोलिसांनी आज आवळल्या. कल्याणमधिल त्याच्या राहत्याघरी त्याला अटक करण्यात आली आणि थेट त्याची मालवणला रवानगी करण्यात आली. आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज मालवण येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या २६ ऑगस्टला हा पुतळा कोसळला होता. त्यानंतर जयदीप आपटे फरार झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. पाटील हा स्वता कोल्हापुर पोलिसांना शरण आला होता. तर जयदीप आपटे हा फरार होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. यात काल रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते तेव्हा घराला कुलूप होते. परंतु, बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले.

अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. जयदीप आपटे इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

पळून पळून कुठे जाणार होता? – मुख्यमंत्री शिंदे

मी परवाच सांगितलं होतं, आपटे पळून पळून कुठे जाणार आहे. त्याची चौकशी होईल कठोर कारवाई होईल. या प्रकरणातील दोषीला मग तो कोणीही असो त्याला सरकार सोडणार नाही. जे लोकं अफवा पसरवत होते त्यांना या अटकेमुळे चपराक मिळाली आहे. छत्रपती अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्घटना झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचा भव्य़ पुतळा उभारला जाणार आहे, या घटनेचं राजकारण करणं देखील दुर्दैवी आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आपटेच्या अटकेच्या घटनाक्रमावर जितेंद्र आव्हांडाचे प्रश्नचिन्ह

वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेच्या घटनाक्रमावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

२६ ऑगस्टपासून फरार असणारा आणि ज्याच्यावर पोलिस लुकआऊटची नोटीस जारी करतात त्या आपटेला कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात येते हे सारेच संशयास्पद आहे. अशी टिका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.  जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणार, पोहे पण बनवलेले होते, चहा पण बनवलेला होता. सगळं झालं होतं, मग अचानक पोलिसांना कळलं दूध गरम झालं आहे. मग पोलीस पोहचले आणि मग अटक करण्यात आली, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *