संबंधित वनअधिकाऱ्यांवर कारवाई होईल का?

राजीव चंदने

 

मुरबाड : शहरातील शेळकेपाडा येथील वन विभागाच्या राखीव जागेत मुरबाड नगरपंचायतीने बिनदिक्कत बिनदास्तपणे चक्क २९ लाख १६ हजार रुपयांचा निधी खर्ची लावून काँक्रीट कंपाउंड बांधून जागेवर कब्जा केल्याची लेखी तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड यांनी ठाणे वन विभागाला सादर केली आली आहे.

या तक्रारीमध्ये कामाच्या क्षेत्राची चौकशी करून वन विभागाची परवानगी नसल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली असतांना देखील सदर काँक्रीट भिंतीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे म्हंटले आहे. तर ही गंभीर बाब हाकेच्या अंतरावर असणाऱ्या फॉरेस्ट पूर्व विभागाच्या निवासी वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील-बाबर यांना जणू माहिती नसल्याचा आव आणला जात असून परिणामी मोबदल्यात मोठी आर्थिक हातमिळवणी झाल्याचा आरोप गायकवाड यांनी पत्रातून केला आहे. भाजपाचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रामचंद्र दुधाळे यांच्या वॉर्डातील हे काम असल्याने सत्तेच्या बाळाचा वापर करून राजरोसपणे अशी कामे पूर्ण केली जात असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

तसेच आरएफओ पाटील यांची इतर जिल्ह्यात बढती झाल्याने त्यांना मुरबाडचा चार्ज सोडण्याची घाई झाली असून त्यांच्या कालखंडात झालेली वृक्षतोड व अन्य कार्यालयीन दप्तराच्या गौडबंगालाच्या चौकशीची देखील मागणी करणार असल्याचे गायकवाड म्हणाले. याबाबत फॉरेस्ट अधिकारी दर्शना पाटील यांचेशी संपर्क न झाल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

कोट

सदरील कामाची चौकशी करू. मुरबाडच्या लोकांना शंका असतात. ज्या आयपीएस ऑफिसरांबरोबर बोलतांना क्रॉस व्हेरिफायला आपल्याला कुठले अधिकार असतात? लेटर आलाय त्याप्रमाणे चौकशी होणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पत्र टपालात आलं असेल तर माझेकडे येईल व त्यानुसार योग्य ती दखल घेऊ.

-संतोष सस्ते, उपवनसंरक्षक अधिकारी, ठाणे

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *