न्यायालयाच्या आदेशांचा विसर
मुंबई : सध्या राज्यासह मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. लक्षवेधी सजावट आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या आकर्षक रोषणाईने शहर उजाळून निघाले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नाक्यानाक्यावर, चौकाचौकात आणि गल्लीबोळात नेत्यांच्या शुभेच्छा फलकांनी शहराचे विद्रुपीकरण झालेले आहे.
बेकायदेशीररित्या फलकबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करण्यावर उच्च न्यायालयाने वारंवार खडसावूनही शहर नेतेमंडळींच्या फलकांनी भरून गेले आहे. ठिकठिकाणी फलकबाजी करून नियमांचे व आदेशाचे उल्लंघन झालेले पाहायला मिळत आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याची संधी राजकीय मंडळी साधत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप व प्रवेशद्वार, महत्वाचे चौक, नाका, कमानी आणि रस्त्याच्या दुतर्फा फलकबाजी करण्यात आली आहे. त्याला कोणताही पक्ष, गट-तट अपवाद नाही. राजकीय मंडळी, पदाधिकारी, आमदार व नगरसेवक होण्यास इच्छुक नेत्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे छोटे – मोठे फलक ठिकठिकाणी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय मंडळींसह विविध कंपन्या व उत्पादने आणि इतर विविध गोष्टींच्या जाहिरातबाजीचे फलक विविध ठिकाणी लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आर्थिक बाजू भक्कम असणे अत्यंत आवश्यक असते. वर्गणी, देणगी आणि राजकीय मंडळींकडून व विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून मंडळांकडे देणगी जमा होत असते. त्यामुळे शुभेच्छांचे फलक गल्ली-बोळात दिसतात.
कंपन्यांपेक्षा नेत्यांच्या जाहिराती
मोठ-मोठ्या कंपन्या सणांच्या काळात रस्त्यावर कमानी उभारून जाहिराती करतात. त्यासाठी मंडळांना देणगी देतात. यंदाही कंपन्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती दिसत आहेत. मात्र, त्यापेक्षा यंदा नेत्यांच्या कमानींची संख्या अधिक दिसत आहे.