सहा गाड्या उडवूनही एफआयआरमधून गायब

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह सहा वाहनांना धडक दिलीय. अपघातावेळी संकेत ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता तरीही पोलिसांनी केलेल्या एफआयआरमधून अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सिनेमासारका तो गायब झाला असल्याची बोचरी टिका समाजमाध्यमांवर सुरु आहे.

या अपघातात चार लोक जखमी आहेत. दोन लोक अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत. ते जीवन मधमाशी झुंज देत आहेत. लाहोरी बार मधून नशेत धुंद होऊन हे लोक गाडीत बसले आणि गाडी चालवत गेले. गाड्या ठोकल्या, सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत. त्यानंतर गाडीची नंबर प्लेट काढून करून टाकली. युवराज स्वतः गाडी चालवत होते. पण, अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, तो कोणत्या पार्टीचा आहे याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असो किंवा कुठल्याही नेत्याचा असो या राज्यात दोन कायदे आहेत का? महाराष्ट्रात हिट अँड रनच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. हे मोठ्या बापाचे मुलं नशेत धुंद होऊन कोणालाही रस्त्यात उडवतात. या मोठ्या बापाच्या मुलांचे एफआयआरमध्ये नावही येत नाही. या राज्यात जर कायदा एक आहे तर फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी नागपूरमधील हिट अँड रन केस बाबत बोलायला हवे.

नागपूरमधील अपघाताची गाडी कोणाची होती? ती गाडी कोणाच्या नावावर होती? गाडी कोण चालवत होतं? त्यानंतर चालकाची अदलाबदली करण्यात आली हे रेकॉर्डवर आहे. आरटीओ ऑफिसरने काय केले? नंबरप्लेट का बदलण्यात आली. जर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या अपघाताशी संबंध नाही तर ही चोरीचपाटी का करण्यात आली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, जर कोणी दुसऱ्या पक्षाचा नेता असता तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या. मात्र आज तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे. तो नशेत धुंद होता. दोन लोक गंभीर जखमी झालेत आणि एफआयआरमध्ये मुलाचे नाव देखील नाही. सर्व पुरावे मिटवण्यात आले आहेत हे अधिकार तुम्हाला आहेत का? देवेंद्र फडणवीस तुम्ही या पदावर बसण्याच्या लायक नाही. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. कायदा फडणवीसांच्या कोठीवर नाचत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *