अलिबाग  (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याची पोलिसांनी 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबूली देत नव्हता. कोणताही पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे त्याला सोडून देण्याच्या तयारीत पोलीस होते. परंतु ज्या घरातून आरोपी निघाला होता; तेव्हा त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता. सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळे टीशर्ट होते. टीशर्ट का बदलले हे सांगू शकला नाही. त्यानंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. त्यामुळे हनुमंत हादरला आणि घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली त्याने दिली. त्याला अटक करण्यात आले आहे, अशी महिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत दिली.

कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची सात महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिषा उर्फ माधुरी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारधार शास्त्रांनी वार करून हत्या केली.  तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व  शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिस्स्यावरून वाद होते अशी महिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे रहायला गेलो होतो. तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते. पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते.

त्याचवेळी त्याने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टीशर्ट होता, अशी माहिती मिळाली. टीशर्ट का बदलला. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे?असे प्रश्न विचारताच तो निरूत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथील शाळेच्या आवारतील सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आला. तो हादरला आणि गुन्ह्याची कबुली दिली.

चिकनपाडा येथील घराचा हिस्सा मिळावा व वेगळे रेशकार्ड काढून द्यावे  अशी मागणी हनुमंत थोरला भाऊ मदन याच्याकडे अनेक वर्ष करत होता. यावरू काही वर्षापूर्वी दोन्ही भावांमध्ये भांडण झाली होती. आपला भाऊ आपल्याला घराचा हिस्सा देणार नाही याची खात्री झाल्यामुळे मदनची हत्या करण्याचे हनुमंतने ठरवले. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. स्वतः पोशीर येथे मामाकडे राहण्यासाठी गेला. रात्री घरी मामाच्या घरी थांबला. मध्यरात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर तो उठून चालत चिकनपाडा येथे भावाच्या घरी गेला. दरवाजा उघडा असल्यामुळे सरळ घरात शिरला. त्याने कुर्‍हाडीने मदन, अनिषा व विनायक यांच्यावर वार केले. घरातील रक्ताचे डाग फुसले. तीघांचे मृतदेह घराशेजारच्या ओढ्यात फेकले. रक्ताने माखलेला आपला सफेद शर्ट फेकला व दुसरे टीशर्ट घालून तो पुन्हा पोशीर येथे मामाच्या घरी गेला व गणपतीसमोर जाऊन बसला.

चिकनपाडा येथे तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी पोशीरमध्ये पोहचली. तरी जणू आपण काही केले नाही असे हनुमंत वावरत होता. भावाच्या हत्येमुळे तो दुःखी झाल्याचे नाटक करत होता. त्यामुळे हनुमंत रात्रभर घरातच होता असे मामांना देखील वाटत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अटकला.  हनुमंतनेच  घराच्या हिस्स्यासाठी सख्खा भाऊ, गरोदर  वहिनी आणि पुतण्याची हत्या केली हे  उघड झाले तेव्हा सारेच हादरून गेले.

रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पथकांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे पुढील तपास करत आहेत.

ही पूर्वनियोजित हत्या आहे. यात एका गरोदर महिलेची हत्या झाली आहे. 11 वर्षाच्या लहान मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही क्रुरता लक्षात घेता आरोपी हनुमंत पाटील याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करून. हा खटला फास्टट्रॅकवर चालवाव अशी न्यायालयाला विनंती करणार आहोत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *