मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या किरीट सोमय्यांना सातत्याने डावलण्यात येत असल्यामुळे आज त्यांनी अखेर गांधीगिरी करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिलीय. आपले दोन्ही हात जोडत पक्षाने त्यांच्यावर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने सोपवलेली मोठी जबाबदारी नम्रपणए नाकारली आहे.
निवडणुकीसाठी कॅम्पेन कमिटीचा सदस्य म्हणून किरीट सोमय्यांची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. पण आपण २०१९ पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे विनम्रपूर्वक ही जबाबदारी नाकारतो असं पत्र किरीट सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलंय.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे २०१४ साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. २०१९ साली शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने त्यांचे तिकीट नाकारले होते. इतकेच नव्हते तर युतीच्या अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेतून किरीट सोमय्यांना अपमानास्पद रित्या बाहेर काढण्यात आले होते. उद्धव ठाकरे किरीट सोमय्या असतील तर आपण पत्रकार परिषदेला येणार नाही अशी अट घातल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितले होते. किरीट सोमय्यां यांनी आज पहिल्यांदा त्याचा जाहिरपणे उल्लेख केला. दरम्यान इतक्या अपमानानंतरही आपण पक्षसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून सदैव शंभर टक्के योगदान देतोय आणि यापुढेही देत राहणार असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामध्ये संजय राऊत यांच्यापासून हसन मुश्रीफ, अनिल परब, अनिल देशमुखांच्या नावाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाने मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिल्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा होती. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. त्यावेळी तीन वेळा माझा वर जीवघेणे हल्ले ही झाले. असो, मी आपल्या या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार असे त्यांनी पक्षाला कळवले आहे.
