विशेष

राजेंद्र साळसकर

महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पद्मालय हे एक पूर्णपीठ मानले जाते. मोरगाव येथे मयुरेश्वराने कनलासुराचा वध केला.त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ म्हणजे मोरगाव!कमरेपर्यंतचा भाग जिथे पडला ते दुसरे पीठ म्हणजे राजूर ! कमरेपासूनचा भाग जिथे पडला ते तिसरे पीठ म्हणजे पद्मालय ! एकदा मोरया गोसावी क-हा नदीत स्नान करीत असताना त्यांच्या ओंजळीत श्रीगणेशाची मूर्ती आली.ही मूर्ती घेऊन ते प्रत्येक भाद्रपद व माघ महिन्याच्या चतुर्थीला मोरगावला येत असत.नंतर त्यांनी चिंचवडला प्राणप्रतिष्ठा केली.मोरगावचा मोरेश्वर चिंचवडला आला म्हणून चिंचवड हे अर्धपीठ मानले गेले.
महाराष्ट्रातील शक्तीपीठां पैकी एक पूर्ण शक्तीपीठ हे पद्मालय मानले जाते.श्रीक्षेत्र पद्मालय हे देवस्थान निसर्गरम्य परिसरात असलेल्या एका सुंदरशा तळ्याकाठी वसलेले आहे.येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर विराजमान आहेत.पैकी उजव्या सोंडेच्या रूपात गणेशाने सहस्त्रार्जुनास दर्शन दिले व डाव्या सोंडेच्या रूपात शेषनागास दर्शन दिले. मंदिरातील या दोन गणेशमूर्ती पैकी एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्याचा उल्लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या आकर्षक गणेशमूर्ती जागृत असल्याची श्रद्धा असल्याने वर्षभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी या क्षेत्री असते.गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला या तीर्थक्षेत्री मोठी यात्रा भरते.या पुण्यपर्वात देशभरातून लाखो भाविक दर्शनासठी पद्मालय येथे येतात.माघशुद्ध चतुर्थीला गजानन जन्मोत्सवही थाटात साजरा करण्यात येतो.नवसाला पावणारा गणपती असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. पद्मालय नावाचं गाव अस्तित्वात नाही मात्र आजूबाजूचा परिसर याच नावानं ओळखला जातो.
हे मंदिर दगडाच्या आतील बाजूस बनले आहे.सदगुरू गोविंदशास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्णौद्धार करून भव्य नवीन मंदिर बांधले. गणेशपुराणात या मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते.काशी विश्वनाथ येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मिती असल्याचेही सांगितले जाते. मंदिराचा कळस ९० फूट उंचीचा आहे. या देवळाच्या डाव्या व उजव्या बाजूस दोन दगडी हत्ती शिल्प आहेत.मंदिराच्या अगदी समोरच साडेचारशे किलो वजनाची सुंदर नक्षीकाम केलेली पंचधातूंची अवाढव्य अशी पुरातन घंटा आपल्याला पहायला मिळते.ही घंटा काशी येथे घडवली गेली असून त्यावर “प्रवाळ क्षेत्र वासिने धरणी धराय नम :”असा मजकूर ओतीव घडणावळीत कोरलेला आहे. मोठा सभागृह आणि त्यापुढे गाभारा अशी मंदिराची रचना आहे.सभामंडपात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टिस पडतो तो श्री गणेशाचे वाहन असलेला मूषक. चार साडेचार फूट उंचीच्या भव्य उंदीराने हातात मोठ्ठा लाडू धरलेला आहे.गर्भागृहाच्या आजूबाजूला आमोद / प्रमोद द्वारपाल भाविकांचे स्वागत करताना दिसून येतात. मुख्य मंदिराच्या भोवती चार दिशांना श्रीगणेशाची एकूण एकवीस मंदिरे आहेत.बाजूच्या तळ्याला मजबूत घाट व पाय-या आहेत. मंदिर व घाट बांधण्यासाठी तळ्यातील दगड वापरले असावेत.येथे बाराही महिने पाणी असते.त्यामुळे सदैव कमळाची फुले उमललेली दिसतात. श्रीगणेशाच्या नित्य पूजेसाठी ती वापरली जातात.
मंदिराला महाभारताचा इतिहास
महाभारताच्या काळात पांडव अदन्यात वासात असताना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी येत असत अशी काल्पनिक आख्यायिका आहे.तसेच पांडव काळात भिम व बकासूराचे युद्ध झाल्याची काल्पनिक कथा आहे. बकासूराचा वध केल्यानंतर भिमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदार प्रहार खडकावर केल्याने त्या ठिकाणी खोल खड्डा पडला;त्यास भिमकुंड म्हणून ओळखले जाते.भिमकु़ंड परिसरात आजही भाताचा कण असल्याच्या पांढ-या खुणा आढळून येतात.एरंडोल शहरात असलेल्या पांडववाड्यातून श्रीक्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.
भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळालेल्या मोर या पक्षांचा वावर मंदिर परिसरात असतो.पावसाळ्याच्या सुरूवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असल्याने या काळात मोठ्ठा पिसारा फुलवून नाचणारे अनेक मोर मंदिर परिसराच्या आसपास पहायला मिळतात.पावसाळ्यात मोराने फुलवलेला पिसारा बघण्यासाठी अनेकजण मुद्दाम येथे येतात.
मंदिर परिसर निसर्गाने नटलेला
मंदिराला लागून तलाव असून मंदिराचे सौंदर्य फुलवते.तर तलावातील विविध प्रकारचे व रंगाचे कमळाचे फुल भाविक व पर्यटनांसाठी आलेल्या आकर्षित करत असते.पावसाळयात संपूर्ण जंगलात हिरवेगार वृक्षाची आकर्षक नजारा दिसत असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद भाविकांना या श्री क्षेत्र पद्मालय मंदिरात येणा-यांना मिळतो. आपण या परिसरात सहलीसाठी आवर्जुन भेट देण्यासाठी आल्यास हे रमणीय स्थळ आहे.आपणास मंदिर सभागृहात आत्मिक अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र पद्मालय ! जळगाव पासून २५ कि.मी.वर एरंडोल पासून ९ कि.मी.अंतरावर असलेले हे देवस्थान गणपती मंदिरामुळे जागृत तीर्थ क्षेत्र मानले जाते.भुसावळ ते मनमाड या मध्य रेल्वेच्या म्हसावद स्टेशन पासून ५ कि.मी.अंतरावर हे देवस्थान आहे.भुसावळ पॅसेजर व भुसावळ नासिक शटल वा अप व डाऊन गाड्यांना म्हसावद येथे थांबा आहे.तिथून खासगी वाहने इथपर्यंत येतात.
क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *