जी गोष्ट पाकिस्तान आजवर नाकारीत आला ती गोष्ट पाकिस्तानने २५ वर्षानंतर का होईना अखेर मान्य केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिक दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानी सैनिकांना संबोधित करताना मान्य केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांना संबोधित करताना १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात मारले गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या बलिदानाची आठवण काढत त्यांना श्रध्दांजली वाहिली आणि २५ वर्षापासून पाकिस्तान जी गोष्ट नाकारीत आलाय त्याची न कळत कबुली दिली. १९९९ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानशी मैत्री करण्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशात पन्नास वर्षापासून सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी वाजपेयींनी प्रामाणिक प्रयत्न केले. दोन्ही देशांचे संबंध सुधरावेत म्हणून त्यांनी दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली . दोन्ही देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले आणि कटुता कमी झाली असे वाटत असतानाच पाकिस्तानने आपला मूळ रंग दाखवला आणि भारताचा विश्वासघात केला. १९९९ च्या कडाक्याच्या थंडीत जम्मू काश्मीर मध्ये बर्फ पडत असल्याचा फायदा घेऊन कारगिल मधील उंचावर असलेल्या कारगिलमध्ये घुसखोरी करून बंकर उभारले आणि त्यात पाकिस्तानी सैनिकांना घुसवले. त्यांनी कारगिलच्या बऱ्याच भागात अतिक्रमण केले आणि तो भूभाग बळकावत भारतीय सनिकांवर आक्रमण केले. भारतीयांसाठी हा मोठा धक्का होता कारण पाकिस्तान असा विश्वासघात करेल असे कोणालाच वाटले नव्हते शिवाय कारगिल मधील परिस्थिती भारतीयांसाठी अनुकूल नव्हती. शत्रुसैन्य उंचीवर असल्याने शत्रू सैन्याच्या गोळीबाराचा मुकाबला करत आल्या सैनिकांना पहाडावर चढावे लागत होते. भारतीय सैन्य अतिशय विपरीत परिस्थितीत शत्रूला धैर्याने तोंड देत होते पण परिस्थिती अनुकूल नव्हती अखेर केंद्र सरकारने हवाई दलाला पाचारण केले. हवाई दलाने लेझर बॉम्बने पाकिस्तानी सैनिकांचे बंकर उध्वस्त केले. कॅप्टन विक्रम बात्रा व त्यांच्या युनिटने मोठी मर्दुमकी गाजवून पाकड्यांना भारताबाहेर हुसकावून लावले. दोन महिने चाललेल्या या युद्धात पाकिस्तान नामोहरम झाला. या युद्धात भारताचे अनेक जवान शहीद झाले. भारताने पाकड्यांना कारगिल मधून हुसकावून लावल्यावर भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसेल अशी भीती वाटू लागल्यावर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी थेट अमेरिका गाठत अमेरिकेला मध्यस्ती करण्याची विनंती केली. अमेरिकेच्या मध्यस्ती नंतर भारताने युद्ध थांबवले. या युद्धात पाकिस्तानची नाचक्की झाली पण पाकिस्तानने कारगिल मध्ये घुसखोरी करणारे पाकिस्तानी सैनिक नसून मुजाहिदीन असल्याची आरोळी ठोकली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान कायम हेच सांगत आला की कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हतेच भारताने मात्र त्याचा कायम प्रतिवाद करत घुसखोरी करणारे पाकिस्तानी सैन्यच असल्याची ठाम भूमिका घेतली. पाकिस्तान मात्र हे नाकारीत राहिला. पण म्हणतात ना सत्य केंव्हा ना केंव्हा तरी मान्य करावीच लागते. आता २५ वर्षानंतर का होईना पाकिस्तानने सत्य मान्य केले. पाकिस्तान विश्वास घातकी आहे असे भारत आंतरराष्ट्रीय समुदायाला जे सांगत आलाय ते २५ वर्षानंतर का होईना पण खरे ठरले.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
