खारघर : खारघर वसाहतीत गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी गणेशभक्त कृत्रिम तलावाला अधिक पसंती देत आहेत. कृत्रिम तलावात दीड दिवसाचे दोन हजार ८४२; तर पाच दिवसांच्या एक हजार ५२२ गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
खारघर परिसरातील भाविकांना आपल्या घराच्या परिसरात गणपती विसर्जन करता यावे, दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये, वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये, तसेच जलप्रदूषण होऊ नये, नैसर्गिक जलस्रोत स्वच्छ राहावेत यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने सेक्टर ४ ते ८, तसेच सेक्टर १०, ११, १२, १४, १५, १८, २० येथील मैदान आणि सेक्टर २१ ग्रामविकास भवन, सेक्टर ३२ साई मन्नत सोसायटीलगत, सेक्टर ३५ हाईड पार्क आणि प्रशांत कॉर्नरशेजारी आणि सेक्टर ३६ येथील स्वप्नपूर्ती आदी ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.
मूर्ती दान करणाऱ्यांना प्रशस्ती पत्र
पालिका प्रशासन तसेच खारघर, तळोजा कॉलनी फेडरेशनने भाविकांनी कृत्रिम तलावाचा उपयोग करावा, असे आवाहन केले होते. त्यामुळे सेक्टर ३५ परिसरातील बहुतांश भाविक दीड आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन करताना दिसून आले. विशेष म्हणजे गणपती मूर्ती दान करणाऱ्या भाविकांना पनवेल पालिका प्रशासनाकडून प्रशस्ती पत्र देण्यात आले.
