भांडुप परिमंडलातील १ लाख २० हजार ग्राहक पात्र

 

ठाणे : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या भांडुप परिमंडलातील १ लाख १९ हजार ५७५ ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळू शकते. त्यासाठी या ग्राहकांना व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफीसह किमान ३० टक्के थकबाकी भरणाऱ्यांना त्वरित वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजना-२०२४ मध्ये सहभाग घ्यावा लागेल. या योजनेतून व्याज व विलंब आकाराचे २८ कोटी ४५ लाख आणि एकरकमी थकबाकी भरल्यानंतरची सवलत असे एकूण ४२ कोटींपेक्षा अधिक रुपयांची सवलत परिमंडलातील ग्राहकांना मिळेल. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.
अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी अथवा किमान ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे व आवश्यकतेनुसार तत्काळ नवीन वीजजोडणी मिळेल. ३० टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकी व्याजमुक्त अशा सहा समान हप्त्यात भरण्याची सवलत उपलब्ध आहे.
भांडुप परिमंलातील १ लाख १९ हजार ५७५ ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. त्यांच्याकडे १७७ कोटी ८१ लाख रुपयांची मूळ थकबाकी असून विलंब आकाराचे २ कोटी २५ लाख व व्याजाचे २६ कोटी २० लाख रुपये थकीत आहेत. पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. याशिवाय महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये इच्छुक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *