स्वाती घोसाळकर
मुंबई: आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर राज्यातील भाजपात मोठे उलथापालथ होत असल्याची बातमी विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. महाराष्ट्राच्या विधानसभेची सुत्रे नितीन गडकरींकडे सोपवण्याची तयारी केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून तिकीट वाटपापासून ते निवडणूक प्रचार यंत्रणा राबविण्याबाबतची सुत्रे गडकरींना देण्यात आली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नुकतेच मुंबई भेटीत भाजपाच्या राज्यातील नेत्यांना याबाबत अवगत केल्याचे बोलले जात आहे. यासगळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्णायक भूमिका बजावल्याचेही समजते. याचाच भाग म्हणून नितीन गडकरी महाराष्ट्रात इन अक्शन झाले आहेत. मुंबई बंगळूरु हा १४ पदरी रस्ता सहा महिन्यात सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी पुण्यातून केलीय. आगामी निवडणूकीचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले असून विकासकामांच्या जोरावर विधानसभेला सामारे जाण्याची व्ह्युव्हरचना भाजपा आखत आहे.
लोकसभा निवडणूकीत भाजपाने २८ जागा लढवल्या होत्या आणि त्यांना फक्त ९ जागा जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे सोबत असताना भाजपाने २३ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपाने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवलि आणि त्याचा जबर फटका भाजपाला बसला आहे. भाजपाची छबी सुधारण्यासाठी सर्वपक्षीय मैत्री असणाऱ्या गडकरींना आरएसएसने पहीली पसंदी दिली असल्याचे समजते. येत्या महिन्याभरात गडकरीं महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
दरम्यान गडकरी विरोधी गटातून त्यांचे जुने व्हिडीयो व्हायरल केले जात आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाला आव्हान देणारे गडकरी असे चित्र रंगवून त्यांना मोदी-शहांपासून दुर करण्याचा प्रयत्नही केले जाईल असे सुत्रांचे म्हणणे आहे. एका जुन्या व्हिडीयोत गडकरी म्हणतायत “मला चांगलं लक्षात आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे. भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत.” असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. ही चर्चा नेमकी कुणाशी झाली? तसंच कधी झाली ? याचे तपशील नितीन गडकरींनी दिले नाहीत. मात्र त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.
ठाकरे सेनेच नेते खासदार संजय राऊत यांनी गडकरी हे सौदेबाजी करणारे नेते नसल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांना देऊन टाकले आहे. विरोधी पक्षातील कोणी अशी ऑफर त्यांना दिली असेल असे मला वाटत नाही असेही राऊत म्हणालेत.
गडकरींचे प्लॅनिंग पुणे–मुंबई !
पुणे : मुंबई पुण्याला अधिक जवळ आणणाऱ्या अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर आता १४ लेनचा रस्ता तयार करणार आहे. हा रस्ता पुढे बंगळूर, संभाजीनगर जाणार आहे. पुणे रिंग रोडला तो रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे गाड्या पुण्यात न येता बाहेरून बंगळूरला जातील. वाहतुकीवरील ताण कमी होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
गरीबांचे जीवनमान सुधारल्या शिवाय आत्मनिर्भर होणे शक्य नाही असेही ते यावेळी म्हणाले.
