नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी केलेल्या सुसज्ज विसर्जन व्यवस्थेमध्ये सातव्या दिवशी 3086 श्रीगणेशमूर्तींना भाविकांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात भावपूर्ण निरोप दिला. विशेष म्हणजे यात 333 शाडूच्या मूर्तींचा समावेश होता. पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या गणेशभक्तांना विशेष प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 137 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन करणा-या 591 पर्यावरण जागरूक नागरिकांनाही कापडी पिशव्यांचे वितरण करून गौरविण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याच्या आवाहनास पर्यावरण जागरूक नवी मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सर्वच विसर्जन स्थळांवर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी विविध सोयी पुरविण्यात आलेल्या होत्या. नागरिकांना विसर्जनस्थळी निरोपाची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबलची पुरेशा संख्येने मांडणी करण्यात आलेली होती. निर्माल्य टाकण्यासाठी ओल्या व सुक्या स्वतंत्र निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ते संकलित निर्माल्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय कचरामुक्तीच्या दिशेने आणखी पुढचे पाऊल उचलत मुख्य विसर्जनस्थळांवर ‘फोर आर’ च्या अनुषंगाने चार डबे ठेवून जागरूकता करण्यात आली.

नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था होती तसेच आवश्यक विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था करण्यात आली होती. नैसर्गिक विसर्जन स्थळापासून नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्याठिकाणी वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांमार्फत कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष होते.

कोपरखैरणे सेक्टर-19 येथील धारण तलावात आधुनिक स्वरुपाचा यांत्रिकी तराफा बसविण्यात आला असून त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग आकाराने मोठ्या व वजन जास्त असलेल्या गणेशमूर्तींसाठी झाला. सार्वजनिक गणेशोत्साव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या यांत्रिकी तराफ्याच्या आधुनिक सुविधेचे कौतुक केले.

कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती. 137 इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.

नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2341 घरगुती तसेच 154 सार्वजनिक मंडळांच्या 2495 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 588 घरगुती तसेच 3 सार्वजनिक मंडळांच्या 591 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 2495 घरगुती व 591 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 3086 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सातव्या दिवशी सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 333 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

यामध्ये – बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 277 घरगुती व 10 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 31 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 336 घरगुती व 26 सार्वजनिक तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 66 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 189 घरगुती व 14 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 48 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 302 घरगुती व 25 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 160 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 388 घरगुती व 30 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 107 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 465 घरगुती व 29 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 47 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 237 घरगुती व 7 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 104 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 147 घरगुती व 13 सार्वजनिक तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 25 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 159 विसर्जन स्थळांवर 3086 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

यापुढील विसर्जन सोहळा मंगळवार, दि.17 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून यादिवशी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व विसर्जन स्थळांवर असणारी यंत्रणा आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षमतेने कार्यरत असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. वाहतुक पोलीस विभागाच्या वतीनेही वाहतुकीविषयी सूचना प्रसारित करण्यात येतील.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून अनेकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करून अनेक नागरिक पर्यावरण जपणूकीचा संदेश प्रसारित करीत आहेत. अशाच प्रकारचे सहकार्य अनंतचतुर्दशीदिनी होणा-या विसर्जनप्रसंगीही नागरिकांनी द्यावे व घराजवळच्या कृत्रिम तलावात श्रीमूर्तींचे शांततेने व भाविकतेने विसर्जन करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *