७३ व्या नाखवा स्मृती पारितोषिक वितरण समारंभात कविता देशपांडे – रेडकर यांचे प्रतिपादन
ठाणे : आजन्म शिकावूवृत्ती हा सर्वागीण व्यक्तिमत्व विकासासह प्रगतीचा पाया असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ञ कविता देशपांडे – रेडकर यांनी केले आहे. श्री आनंद भरती समाजाच्या ११४ व्या गणेशोत्सवानिमीत्त आयोजित ७३ व्या नाखवा स्मृती वार्षिक शैक्षणिक गौरव समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करताना, सृजनशीलता, संपर्क- संवाद कौशल्य, दोषदर्शी विचारधारा व जिवाभावाची साथसंगत या चार गोष्टींची कायम कास धरलीत तर जीवनात तुम्ही यशस्वी चौकार माराल. आवड-कल यांचा मागोवा घेताना अपयशाने खचू नका असा मौलिक सल्लाही कविता देशपांडे – रेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. या क्षैक्षणिक गौरव समारंभात सुमारे ९० विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल गौरवण्यात आले. संस्थेच्या ११४ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत प्राणिशास्त्र (झुआलॉजी) विषयात विद्या वाचस्पती (पीएचडी) ठरलेल्या डॉ. दिलीप वसंत नाखवा यांचा विशेष गौरव करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना डॉ दिलीप नाखवा म्हणाले, प्रपंच सांभाळून राष्ट्रीय कबड्डीपटू बाळाराम नाखवा, ठाणे महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते ठाणेभूषण कृष्णकुमार कोळी यांनी वकिलीची सनद मिळवली. पीएचडी करताना हे दोघे माझे आदर्श होते. निवृत्तीनंतर वयाच्या ७३ व्या वर्षी हे यश मिळवले.
यंदाच्या १० वी शाळांत परिक्षेत ९७.४० टक्के गुण संपादन केल्याबद्दल दुर्वा भाऊ जाधव हिचा ७३ वे कै यशवंत लक्ष्मण नाखवा स्मारक पारितोषिक तर याच परिक्षेत ९०.४० टक्के गुण संपादून संस्थेत सर्वप्रथम आल्याबद्दल आर्यन दुर्गेश डोलकरचा ७२ वे कै दगडू पांडू नाखवा स्मारक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.सनदी लेखपालची परीक्षा पास होणारा संस्थेचा खेळाडू अभिषेक गुप्ता, एमबीए झालेली सोफिया कोळी आणि आयसीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या आरव ठाकूरला यावेळी गौरवण्यात आले. यावेळी समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश धीरोलिया, उपाध्यक्ष विनोद नाखवा व्यासपीठावर उपस्थित होते.
