बिहार हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाते. येथून वाहणारे राजकीय वारे संपूर्ण देशाचे वातावरण बदलून टाकतात. केंद्रातील सध्याचे सरकारही बिहारच्या पाठिंब्यावर चालत आहे. सध्याच्या परिप्रेक्ष्यात बिहारच्या राजकारणाबद्दल बोलायचे झाले, तर येथे मध्यावधी निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. अर्थात अशी चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात ही चर्चा अनेकदा झाली आहे; परंतु आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेतेही बिहार विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची चर्चा करीत आहेत, ते पाहता लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा प्रयत्न आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे; परंतु लोकसभेच्या निवडणुकीत मतदार वेगळा कौल देतात आणि विधानसभेच्या निवडणुकीत वेगळा असे बऱ्याचदा होत असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चांगले यश मिळाले होते; परंतु त्यानंतर दीड वर्षांनी झाल्या निवडणुकीत संयुक्त जनता दल, भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आले असले, तरी नितीश कुमार यांच्या जागा फारच कमी झाल्या. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून तर विधानसभेच्या निवडणुका एक वर्ष अगोदरच घेण्याचे घाटत आहे, असे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये विधानसभेच्या अनेक जागा रिक्त झाल्या. या जागांवर पोटनिवडणूक होणार होती, मात्र आजपर्यंत या पोटनिवडणुकीबाबत कोणतीही अधिसूचना काढण्यात आलेली नाही. यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लवकर होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीसोबतच बिहारमध्येही विधानसभा निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्री नितीश कुमारही त्यास अनुकूल असल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असला, तरी नियोजित वेळेपूर्वी निवडणुका व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. भाजपनेही निवडणुकीत उतरण्याचे ठरवले आहे. इतर सर्व पक्षांच्या राजकीय घडामोडीही याचे संकेत देत आहेत. राजकीय समीकरणे जुळवण्याचे काम सुरू झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या कामगिरीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही जागांची तीच टक्केवारी कायम राहावी, अशी नितीश कुमार यांची इच्छा आहे. सध्या नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा बिहार विधानसभेत तिसऱ्या क्रमांकांचा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमार दुखावले आहेत. गेल्या निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाने ज्या पद्धतीने संयुक्त जनता दलाच्या मतपेढीला धक्का दिला, ते नितीश कुमार अजूनही विसरलेले नाहीत.
आगामी विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने खास असणार आहे. बिहारमधील प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही तयारी जोरात सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीतही मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा राष्ट्रीय जनता दलाने विरोधकांची चांगली मोट बांधून दहा जागा मिळवल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल त्याच धर्तीवर जातीच्या आधारावर उमेदवारांना तिकीट देणार हे स्पष्ट झाले आहे. सर्व जातींना या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी एकत्र आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे कोलमडणार आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कोणत्या पक्षाच्या जातीनिहाय चालीला जनता साथ देईल, हेही पाहावे लागेल. बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे मूळ मतदार मोठ्या संख्येने स्वर्ण, वैश्य आणि ईबीसी आहेत. त्यांची संख्याही खूप जास्त आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मूळ मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्याची प्रचिती गेल्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आली. त्यामुळे ‘एनडीए’ला अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक जातींकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘एनडीए’चे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तीच चूक पुन्हा करायची नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत किमान स्वत:च्या मूळ मतदारांना आकर्षित करण्यावर या आघाडीचा भर आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी या आघाडीतील पक्षांना नव्याने प्रयत्न करावे लागतील. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या विरोधात ‘अँटी इन्कम्बन्सी’ दिसून येत आहे. जनतेला आता नितीश कुमार यांच्या जागी दुसरा चेहरा पाहायचा आहे. आता संयुक्त जनता दलामध्येही नेतृत्वासाठी नव्या चेहऱ्याचा विचार केला जात आहे. त्याचवेळी भाजपचा एकही प्रमुख चेहरा दिसत नाही. बिहारमध्ये आजपर्यंत भाजपचा एकही मुख्यमंत्री नसण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. तेजस्वी हे आता राष्ट्रीय जनता दलाचे भावी नेते आहेत. त्यांना चांगले भविष्य असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांना आगामी काळात लोकांमध्ये नवा चेहरा आणावा लागेल. अन्यथा, संयुक्त जनता दलाचे मतदार हळूहळू दुसरा पर्याय शोधतील. जास्त जागा मिळवण्याचे मोठे आव्हान संयुक्त जनता दलापुढे आहे. बिहारमध्ये ईबीसी जातींची लोकसंख्या ३६ टक्के आहे. या व्होट बँकेच्या जोरावर २००५ च्या निवडणुकीत नितीश कुमार सत्तेवर आले. लव-कुश हे नितीश कुमारांचे मूळ मतदार मानले जातात. सध्या सर्वच पक्षांची नजर आपल्या मूळ मतदारांसह या जातींच्या व्होटबँकेकडे लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय जनता दलाने कुशवाह यांना १० जागा दिल्या होत्या, त्यामुळे ‘एनडीए’च्या जागांमध्ये घट झाली होती. लोकसभेत राष्ट्रीय जनता दलाने अभय कुशवाह यांना आपला नेता घोषित करून ही व्होट बँक आपल्या मागे ठेवण्याची चाल खेळली आहे. त्याचबरोबर भाजपवर नाराज असलेल्या सवर्ण जातींना आपलेसे करण्याचाही तेजस्वी यांचा प्रयत्न आहे. वैश्य जातीच्या नाराजीचा डंका भाजपने मागील निवडणुकीतही पाहिला आहे. आता राष्ट्रीय जनता दलाने या नाराज व्होट बँकांना आकर्षित करण्याची व्यूहनीती आखली आहे. यात ते यशस्वी होताना दिसत आहेत.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. तळागाळातील अनेक गावांतील लोकांशी ते बोलत आहेत. या अनुषंगाने त्यांनी पक्ष स्थापनेची प्रक्रियाही सुरू केली आहे. दोन ऑक्टोबर रोजी ’जन सूरज’ या नावाने पक्षाची औपचारिक घोषणा केली जाईल. बिहारच्या एक कोटी जनतेला घेऊन पक्ष स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला आहे. पाटण्यामध्ये त्यांनी हजारो लोकांच्या अनेक जाहीर सभाही घेतल्या आहेत. त्यात त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. मुस्लिम समाजातही त्यांची लोकप्रियता वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा पक्ष तिसरी आघाडी म्हणून लोकांमध्ये असेल, असे मानले जात आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करण्याचा दावा केला आहे. अशा स्थितीत बिहारमधील राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. परिवर्तनाच्या या वाऱ्याने सर्वच पक्ष त्रस्त झालेले दिसत आहेत. राष्ट्रीय जनता दलाने त्यांना भाजपचे एजंट असल्याचे म्हटले आहे. जनता प्रशांत किशोर यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ शकतात. ते २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत आपले सरकार बनवणार असल्याची बढाई मारत आहेत. अशा स्थितीत मध्यावधी निवडणुका घेतल्या, तर किमान प्रशांत किशोर या विधानसभा निवडणुकीत आपला खेळ खराब करू शकणार नाहीत, असे नितीश कुमार यांना वाटते. जाती, जमातीचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने आता दुसरे समीकरणही जोडण्यास सुरुवात केली आहे. आता राष्ट्रीय जनता दलाने खलाशांची व्होट बँक आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमधील डझनाहून अधिक छोट्या जातींची व्होट बँक मुकेश साहनी यांच्याकडे आहे. या जातींच्या मतांवर राष्ट्रीय जनता दलाचा डोळा आहे. साहनी यांना उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरवून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा राष्ट्रीय जनता दलाचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत साहनी यांच्या ‘व्हीआयपी’ पक्षाला एकही जागा मिळवता आली नसली, तरी मतदानाची टक्केवारी चांगली राहिली आहे. अशा स्थितीत साहनी यांचे मनोबलही उंचावले आहे. खलाशांना आरक्षण देण्याच्या मागणीबाबत टोलवाटोलवी केली जात आहे.
केंद्र सरकार आपल्या मागण्या कोठूनही पूर्ण करू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. अशा स्थितीत ते तेजस्वी यादव यांच्यासोबत नवे जातीय समीकरण तयार करत आहेत; मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार ‘एनडीए’मध्ये परतले आणि लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने १२ जागा जिंकल्या. नितीश कुमार यांनी ‘एनडीए’ला तीस जागा मिळवून दिल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत नऊ जागा कमी आहेत; पण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये भाजपची खराब कामगिरी पाहिली, तर त्या तुलनेत बिहारमध्ये भाजपने खूपच चांगली कामगिरी केली आहे. २०१९ मध्ये ज्यांचे खातेही उघडले नव्हते, त्या राष्ट्रीय जनता दलाने या वेळी चार जागा जिंकल्या आहेत. महाआघाडीने ९ जागा जिंकल्या असून काँग्रेसला पाठिंबा देणारा एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यानुसार महाआघाडीच्या दहा जागा आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीत राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर भाजप आणि नंतर संयुक्त जनता दलाला मते मिळाली. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या पक्षात गोंधळाची स्थिती आहे. एकीकडे नितीश कुमार यांचे महत्त्व आणि उंची दोन्ही वाढली आहे. आता केंद्रात सरकार टिकण्यासाठी भाजपला नितीश कुमारांची गरज आहे. अशा स्थितीत नितीश कुमार विधानसभा निवडणुका लवकर घेण्याची तयारी करीत असून, स्थानिक भाजप नेते त्याला तयार आहेत. नितीश कुमार खरेच ही खेळी करतात, की विरोधकांना कात्रजचा घाट दाखवतात, हे पाहायचे.