पालिका ७३ लाख ९५ हजार रुपयांचा करणार खर्च
मुंबई ः वाहनांची ये-जा सुरळीत होण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील मलवाहिन्यांवरील गटारे झाकणांनी बंद करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण प्रचालन खात्यांतर्गत मुख्य मलवाहिनी शहर, मुख्य मलवाहिनी पूर्व उपनगरे, तसेच मुख्य मलवाहिनी पश्चिम उपनगरे या उपविभागांकडून मृदु लोखंडी झाकणे बसवली जाणार आहेत.
पालिकेकडून या झाकणांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून यासाठी ७३ लाख ९५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबई शहर व उपनगरातील मलवाहिन्यांची एकूण लांबी अंदाजे २००६ किलोमीटर इतकी आहे. मलजल जमा करून मुख्य मलवाहिनी किंवा मलनलिकेद्वारे वाहून नेणे व उदंचन करून त्याची विल्हेवाट लावणे आदी कामे मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत केली जातात.
या संपूर्ण मलनिस्सारण जाळ्यांचे व त्यावरील गटारांची देखभाल मलनिस्सारण प्रचालन खात्यातील मुख्य मलवाहिनी उपविभागांद्वारे केले जाते. वर्दळीतील रस्ते, चौकातील, वसाहतींजवळची गटारे उघडी असल्याने अपघाताची शक्यता असते. वाहनांची सुरळीत ये-जा होण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी मलवाहिन्यांवरील गटारांना झाकणांनी बंदिस्त केले जाते. सुमारे ४५५ झाकणांचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून यासाठी ७३ लाख ९५ हजार २९६ रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रशासकीय मान्यतेनंतर याची अंमलजावणी केली जाणार आहे.
