कर्जत : तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगडचे विद्यमान कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळाचे सक्रीय सभासद, एकता बौद्ध सेवा संघ रहाटाडचे मार्गदर्शक, बहुजन समाजात वावरणारे बहुआयामी व्यक्तिमत्व, आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक, तळा तालुक्यातील सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील विशेषतः क्रिकेट मधील एक नावाजलेले नाव अर्थात कालकथित केशव लोखंडे यांचे शनिवार, १४ सप्टेंबरला रात्री २.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिकरीत्या कांदिवली मुंबई येथे निधन झाले आहे. मृत्यसमयी त्यांचे वय ५४ वर्षे इतके होते.

केशव लोखंडे यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळाऊ होता. तळा तालुक्यातील रहाटाड सारख्या छोट्याशा गावात राहून तळा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई सारख्या शहरात त्यांनी आपल अस्तित्व निर्माण केल. पदवी पर्यंत शिक्षण झाल्यावर नामांकित अश्या स्टार स्पोर्ट्स मध्ये प्रोडक्शन हेड म्हणून बरेच वर्ष नोकरी केली. ते स्वतः नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे असले तरी कुटुंब गावी असल्याने व समाजाची सेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपल्या गावाशी, तालुक्याशी तसेच क्रीडा क्षेत्राच्या निमित्ताने बहुजन वर्गाशी, क्रीडा तरुणांशी त्यांची कायम नाळ जोडली गेली होती. वीस बावीस वर्ष स्टार स्पोर्ट्स सारख्या चॅनल मध्ये नोकरी असल्याने त्यांची तरुणांमध्ये एक वेगळीच इमेज होती. या क्षेत्रात काम करत असताना अनेक तरुणांना देखील त्यांनी या मीडिया क्षेत्रात आणले व त्यांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून दिला. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. तळा तालुक्यात आपल्या रहाटाड या गावी नेहमी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा स्वखर्चाने ते भरवत असत. त्यांनी वीस बावीस वर्षापूर्वी तळा तालुक्यात नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा भरविल्या होत्या आणि त्या केबल वर लाईव्ह होत्या. २० वर्षापूर्वी क्रिकेट खेळताना तळ्यातील क्रिकेटर स्क्रीन वर दिसू शकले ते फक्त केशव लोखंडे यांच्या क्रिकेट प्रेमामुळेच. तळा तालुक्यातील तरुणांनी जेव्हा मुंबईत तळा तालुका क्रिकेट असोसिएशन ची स्थापना केली तेव्हा केशव लोखंडे यांना अध्यक्ष करून त्यांचा यथोचित गौरव केला. आज तळा तालुक्यातील एक प्रेमळ, शांत, संयमी व बहुआयामी व्यक्तिमत्व हरपला. त्यांच्या जाण्याने केवळ बौद्ध समाजातच नव्हे तर बहुजन समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मालाड, मुंबई येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध समाजातील, विविध क्षेत्रातील शेकडो मित्रपरिवार, अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कालकथित केशव लोखंडे यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि) रायगड, त्यांचा मित्र परिवार तसेच तळा तालुकावासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अचानक झालेल्या या आघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून लोखंडे कुटुंबीयांना सावरण्याचे बळ मिळो हीच बुध्दांचरणी प्रार्थना. त्यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभेचा कार्यक्रम सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मूळ गावी लुम्बिनी बुद्धविहार, रहाटाड येथे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *