काहीतरी नवीन…
श्याम तारे
आपल्यापैकी अनेकांची पिढी रेडीओच्या काळात मोठी झाली असेल आणि इतरांची पिढी कदाचित संगणकांची सुरुवात झाली त्या काळातली असेल. परंतु आज शाळेत शिकणारी जी पिढी आहे ती मात्र निश्चितपणे मोबाईल यंत्रणेच्या ओळखीची आणि तिच्याशी घनदाट मैत्री असणारी आहे हे मान्य करावे लागेल. या पिढीला आपण जे काही नाव द्यायचे ते दिले तरी काही प्रमाणात विज्ञानाच्या भाषेत तिला ‘अल्फा’ पिढी असेच संबोधले जाते. ही पिढी साधारणपणे २०१० ते २०२४ या काळात जन्मलेली आहे.
पाळण्याला बांधून ठेवलेला मोबाईल आणि त्यावरील उंदीर मांजर (पक्षी टॉम अँड जेरी) यांची न संपणारी आणि सातत्याने काही ना काही तरी दाखवणारी चित्रे आणि आवाज यांनी ही पिढी मोठी होते आहे. त्यानंतर आई काम करीत असेल तेव्हा हातात देऊन ठेवलेल्या मोबाईलने बालकांना अनायासे भाषेतले काही शब्द शिकवले. काही काळाने त्यांना हवे ती चित्रफीत किंवा प्रसंग शोधता येऊ लागला आणि त्यांचे आपल्या आई-वडिलांमुळे काही बाबतीत अडत नाही असे दिसते. मुले मोठी झाली असतील आणि ती शाळेत जाऊ लागले असतील तर ती अनेकदा पालकांच्या सोबत बाजारात जायला देखील फारशी तयार नसतात असे पाहिले गेले आहे.
ही मुले आपल्या मोबाईल सदृश इतर साधनांच्या किती आहारी गेली आहेत याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. विज्ञानाचे म्हणणे असे की आपण ‘मर्यादित’ वेळेसाठीच ही साधने उपलब्ध करून देऊ शकलो तरच यात काही बदल होऊ शकेल. पण ते कठीण दिसते आहे. येथे एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल की मुलांची ही ‘ऑनलाईन संस्कृती’ पालकांच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आहे. कल्पना अशी की साधारण १४ वर्षे वयापर्यातची मुले त्यांच्या या तंत्रज्ञानाच्या आहारी गेली आहेत आणि त्यामुळे मुळातच त्यांची खऱ्या-खुऱ्या जगाशी संवाद करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यांची बोली भाषेतली लकब बदलली आहे आणि ही मुले एकमेकांशी बोलतानाही मोबाईल वरील विविध ‘गेम्स’ चीच चर्चा करतात. प्रगत देशांमध्ये ८ ते १२ वर्षाच्या अन्धाजे ६५ टक्के मुलांकडे आज आयफोन आहे आणि काहींकडे याशिवाय आयपॅड सुद्धा आहे. चित्रपटापेक्षा ‘रील’ सारख्या कमी कालावधीच्या चित्रफिती त्याना अधिक आवडतात असेही दिसून आले आहे.
हे सगळे असले तरी मोबाईल वापराचा मुलांवरील परिणाम चांगला नाही असे सिद्ध करता आलेले नाही. इतकेच नाही तर मोबाईल फोन किंवा आयपॅड मुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असेही दिसलेले नाही. उलट असे दिसून आले की ‘अल्फा’ पिढीतील मुले सुद्धा तंत्रज्ञानाच्या प्रभावाने काळजीत पडलेली दिसतात. शालेय अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान आले आहे ते पाहिले तर आजच्या पालकांना आजचे शिक्षण कठीण आहे (स्पर्धा सोडली तरी) हे मान्य करावे लागेल. तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यात निरोगी संवाद कसा असू शकेल हे कधीतरी त्यांच्या मनात शोधावे लागेल.
“ही नवी पिढी असे मानते की त्यांच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले गेले आहेत. ही मुले जे लिहितात, बघतात आणि जगतात त्याबद्दल देखील समजावून घेतले जात नाही” असे संवाद क्षेत्रातले एक तज्ञ जेस राउखबर्ग म्हणतात. आपण मोबाईल साधनांवर अधिक काल खर्च करीत आहोत हे मोठ्या मुलांना समजतेच आणि त्यांना हेही समजते की आपली लहान बहीण भावंडे ही तर मोबाईलला ‘चिकटलेलीच’ असतात.
विचार करणारा एक मुलगा म्हणाला, “मुलांना एक पिढी न समजता पिढीच्या पायऱ्या समजायला हव्यात. मग प्रत्येक पायरीवर तंत्रज्ञान कसे प्रगत होते आणि त्याचा कसा परिणाम होतो हे मोठ्यांना समजू शकेल. ‘मेमे\ हा प्रकार मोठ्यांना जितका समाजात नसेल तितका तो ‘अल्फा’ पिढीला समजतो पण त्यांना ‘ऑनलाईन आणि ऑफलाईन’ संवादात फरक असतो हे लक्षात येत नाही.
हे सगळे असले तरी मुले आपलीच आहेत आणि याच जगाची नागरिक आहेत आणि त्यामुळे जुळवून तर घ्यावे लागणारच…मग तेच का करू नये?…
प्रसन्न फीचर्स