Untitield-1
अशोक गायकवाड
कर्जत : आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडलेल्या ६ कोटींच्या कर्जत मधील आंबराई येथे असलेले खुले नाट्यगृह व क्रीडांगण यांच्या लोकार्पणाची कर्जतकर आतुरतेने वाट पहात असल्याचे उपरोधिक वक्तव्य समाजसेवक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी केले आहे.
कर्जत नगरपरिषदने १९९५ मध्ये युडीआरसी अंतर्गत आंबराई येथे खुल्या नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. ५२ लाख रूपये अपेक्षित खर्चापैकी कर्जत नगरपरिषदने यूडीआरसीकडून २२ लाख रुपये कर्ज घेतले होते व शासनाकडून ३० लाख रुपये अनुदान मिळाले होते.९५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही नोव्हेंबर २०२० पर्यंत म्हणजे २५ वर्ष अर्धवट राहिलेले काम नाट्यरसिक , क्रीडारसिक , जागृत पत्रकार , नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये खुले नाट्यगृह आणि क्रीडांगण विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला.या कामासाठी सुमारे ४ कोटी ९७ लाख ५५ हजार रुपये खर्च केले आहेत.म्हणजे या प्रकल्पावर जवळ जवळ सहा कोटी रुपये खर्च करून सुध्दा २९ वर्षांत ह्याचा वापर करता येऊ नये ही गंभीर बाब आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोकाट सुटलेली कुत्री , दागिने खेचून नेणारे चोरटे व सुसाट वाहनं चालवणारे चालक यांच्यापासून जीव मुठीत घेऊन ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात. जर का आंबराई येथे फिरण्याची सोय झाली तर ज्येष्ठ नागरीकांना सुरक्षितपणे फिरता येईल.तसेच नाट्यगृह सुरू झाले तर तेथे ज्येष्ठ नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करता येतील.तरी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते , आमदार , माजी आमदार , भावी आमदार (सर्व इच्छूक उमेदवार ) यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून हा २९ वर्ष रेंगाळलेला प्रकल्प ताबडतोब लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा असल्याचे समाजसेवक दिलीप प्रभाकर गडकरी यांनी म्हटले आहे.
