ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ मोहीम राबवण्यात येत असून ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ४३१ ग्रामपंचायती अंतर्गत सफाई कर्मचारी यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करण्यात आले. तसेच सफाई मित्र यांच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.‌
या मोहिमेची थीम “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” अशी निश्चित करण्यात आली आहे. मोहिमेत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ आयोजित करण्यात येत असून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.‌ या मोहिम अंतर्गत गावे श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जसे सार्वजनिक स्थळे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, नद्यांचे किनारे, रस्ते आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. मोहिमेत गावकरी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयातील युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *