विरार : विरार मध्ये गणपती  विसर्जन करताना, गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ता 18 रोजी पहाटे साडे साडे तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे.  वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तात्काळ बाहेर काढले पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. पाण्यात फिट आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  याबाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अमित सतीश मोहिते ( वय 24) असे मृत्यू झालेल्या गणेश भक्ताचे नाव असून, विरार पूर्व फुलपाडा परिसरातील तो राहणारा होता. गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पालिकेने या तरुणाला हायर केल्याची माहिती ही त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने मंगळवारी गणारायाला मोठ्या भक्तिभावाने गणेश भक्तांनी निरोप दिला आहे. आज पहाटे तीन वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. विरार पूर्व तोटले तलावात विसर्जन सुरू असतानाच पहाटे साडे तीन वाजता विसर्जन करणाऱ्या तरुणाला अचानक पाण्यात फिट आले, आणि त्याच वेळी तो तलावात बुडाला होता. स्थानिक नागरिक आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तात्काळ बाहेर काढले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने फुलपाडा परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *