मुंबई :माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ वाढदिवस चषक शालेय-कॉलेज ज्युनियर खेळाडूंच्या सुपर लीग कॅरम स्पर्धेत आनंदराव प्लॅटीनियम संघाने अजिंक्यपद पटकाविले. सुपर लीगचे सर्व सामने जिंकणाऱ्या आनंदराव प्लॅटीनियम संघाने अंतिम फेरीत अभिजित कॅप्टन्सीचा २-१ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आनंदराव प्लॅटीनियमच्या विजयाचे शिल्पकार चारही सामन्यात अपराजित राहिलेले भव्या सोळंकी व प्रसन्ना गोळे ठरले. सांघिक लीग व अंतिम सामन्यात विजयी खेळ करणाऱ्या पुष्कर गोळेने अप्रतिम खेळ करूनही अभिजित कॅप्टनसीला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण उपस्थित होते.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व सुमती सेवा मंडळ-दहिसरतर्फे को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई व माहीम ज्युवेनील स्पोर्ट्स क्लब सहकार्याने माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या सुपर लीग सांघिक कॅरम स्पर्धेचा शिवाजी पार्क येथे अंतिम सामना चुरशीचा झाला. पुष्कर गोळेने आनंदराव संघाच्या कुलदीप चुडासामाचा १८-० असा सहज पराभव करून अभिजित संघाला १-० अशी धडाकेबाज आघाडी मिळवून दिली. परंतु त्यानंतर भव्या सोळंकीने अभिजित संघाचा कर्णधार सार्थक केरकरला ११-० असे सहज हरवून आनंदराव संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्णायक सामन्यात आनंदराव संघाचा हुकुमी कॅरमपटू प्रसन्ना गोळेने अभिजित संघाच्या अद्वैत पालांडेचा १५-७ असा चुरशीचा पराभव केला आणि आनंदराव संघाच्या विजेतेपदावर २-१ असा शिक्कामोर्तब केला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक वेदांत पाटणकर, तृशांत कांबळी, अर्णव गावडे, उमर पठाण यांच्या आयडियल चँम्पस संघाने मिळविला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सेक्रेटरी अभय हडप व असिस्टंट सेक्रेटरी दीपक पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी सत्कार केला. शालेय व महविद्यालयीन विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी तसेच पालक-शिक्षक वर्गाने वाढदिवसाच्या प्रार्थनेसह शुभेच्छांच्या गौरवानी भारावलेल्या आनंदराव अडसूळ यांनी संयोजकांना शालेय स्पर्धांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
००००