अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दोन महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार असून या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस हे प्रतिस्पर्धी आहेत. दोघेही आपला प्रचार जोरदारपणे करीत आहे. दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. दोघेही आपल्याला निवडून द्या अशी मागणी जनतेकडे करीत आहेत. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याची बातमी आली आणि जगभर खळबळ माजली. दोन महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा दुसरा जीवघेणा हल्ला आहे. सुदैवाने दोन्ही वेळा त्यातून ते बचावले. १३ जुलै रोजी अमेरिकेतील पेनिसिल्व्हिया राज्यातील एका प्रचार सभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ट्रम्प यांच्यावर चालवण्यात आलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हा हल्ला सभेपासून जवळ असलेल्या छतावरून करण्यात आला. एका वीस वर्षीय तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला होता. तो हल्ला ताजाच असताना त्यांच्यावर नुकताच असाच एक जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला डोनाल्ड ट्रम्प हे वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्स वर गोल्फ खेळत असताना त्यांच्यावर करण्यात आला. झुडुपात लपून बसलेल्या रायन रूथ या तरुणाने त्याच्या ए के ४७ या रायफल मधून त्यांच्यावर गोळीबार केला. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा यावेळीही त्यांचा जीव वाचला. माजी राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या इतक्या मोठ्या जागतिक नेत्यांवर जीवघेणा हल्ला होणे हे अमेरिकेच्या गन संस्कृतीचे लक्षण आहे. जगासाठी जरी ही खळबळजनक घटना असली तरी अमेरिकेसाठी हे काही नवे नाही कारण याआधीही अमेरिकेच्या काही माजी राष्ट्राध्यक्षांवर असा जीवघेणा हल्ला झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, जेम्स गारफील्ड, विल्यम मॅककिनले आणि जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली आहे. केवळ राजकीय नेतेच नाही तर जनता देखील या गन संस्कृतीला कायम बळी पडत आली आहे. गन संस्कुती मुळे अमेरिकेत लाखो नागरिक मरण पावले आहेत. अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या ऐकली तर आपल्याला धस्स होईल कारण अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मागील पन्नास वर्षात १४ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत दररोज सरासरी १०० लोक मरण पावतात. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. कारण जागतिक महासत्ता असलेल्या देशात अशा प्रकारे लोकांचा जीव जात असेल तर ते धक्कादायकच नाही तर चिंताजनक देखील आहे. अमेरिकेत शाळेत गोळीबार झाल्याचा आणि त्यात अनेक शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, वाचतो अर्थात याला अमेरिकाच जबाबदार आहे. अमेरिकेत पूर्वीपासून गन संस्कृती अस्तित्वात आहे. दुकानातून फळे, भाजीपाला मिळतात तशा तिथे बंदुका विकत मिळतात. बंदुका चालवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपल्याकडे जसा शासकीय परवाना काढावा लागतो तसा तिथे काढावा लागत नाही. तिथे बंदुका आणि काडतूस सहज मिळतात म्हणूनच तिथे गन संस्कृती उदयास आली. आता हीच गन संस्कुती अमेरिकेच्या मुळाशी आली आहे. अमेरिकेच्या या गन संस्कृतीवर अनेकांनी चिंता देखील व्यक्त केली आहे पण अमेरिकेच्या नेत्यांनी ती कधीही गांभीर्याने घेतली नाही. खुद्द डोनाल्ड ट्रम्प हे गन संस्कृतीचे मोठे समर्थक आहेत. २०१६ मध्ये त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रिव्हॉल्वर व रायफल हे स्वसंरक्षणासाठी एक उत्तम शस्त्र असल्याचे म्हंटले होते. केवळ ट्रम्पच नाही तर अमेरिकेतील अनेक नेते हे गन संस्कृतीचे समर्थक आहेत. आता मात्र हीच संस्कुती त्यांच्या जीवावर उठली आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
