खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धा
बारामती : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, क्रीडाजागृती आणि बारामती येथील एनव्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून खेलो इंडीया वुमेन्स लीग स्पर्धेचे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. २० आणि २१ सप्टेंबर रोजी संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होत असलेल्या या स्पर्धा सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार होत आहेत.
क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केवळ मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमीत्ताने बारामती तालुक्यामधील मुलींच्या क्रीडागुणांना वाव मिळवा म्हणून युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकाराने बारामती तालुका स्तरावर शालेय मुलींसाठी तीन वयोगटात सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे २०० हुन अधिक मुलींनी सहभाग घेतला आहे.
वुमेन्स लीग सायकल स्पर्धा सबज्युनीअर (१२ ते १६ वर्ष वयोगट), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) आणि १९ वर्ष व त्यावरील अशा तीन वयोगटात होईल. टाईम ट्रायल आणि रोड रेस (मास स्टार्ट) या दोन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन आज, शुक्रवारी सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते होत आहे. याप्रसंगी बारामती शहराचा आणि तालुक्याचा क्रीडाक्षेत्रात नावलौकीक जगभर पसरवणा-या युवा खेळाडूंना सन्मानीत करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सकाळी १०:०० वाजता खासदार सौ. सुनेत्रावहिणी पवार यांच्या शुभहस्ते स्पर्धेठिकाणी होणार असून यावेळी मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, बित्तमबातमिचे संपादक आणि सलग सहा वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना हजर राहुन वार्तांकन करणारे संदीप चव्हाण, मराठीमधील पहिल्या महिला क्रीडा पत्रकार स्वाती घोसाळकर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, संयोजन समिती आणि बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास वायकर आदी मान्यवर हजर राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पंच मा. धरमेंदर लांबा यांची या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून नेमणूक झाली असून सुदाम रोकडे, दिपाली पाटील, मिनाक्षी शिंदे, प्रा. साईनाथ थोरात, भिकन अंबे, बिरु भोजने, संजय दराडे स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पार पाडणार आहेत. केंद्र सरकारतर्फे साईचे निरीक्षक म्हणून सार्थक गंगावणे आणि कुस्ती प्रशिक्षक अमरसिंग निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे.
0000
