उल्हासनगर: उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची मुंबईत बदली झाली आहे. उल्हासनगर शहरासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना शहरातून मोठ्या सन्मानाने निरोप देण्यात आला. उल्हासनगर कॅम्प ३ येथील शहीद जनरल अरुण कुमार वैद्य सभागृहात (टाउन हॉल) त्यांचा सन्मान आणि निरोप समारंभ पार पडला. या समारंभात आमदार कुमार आयलानी, विविध राजकीय, सामाजिक, आणि व्यापारी नेते, जागरूक नागरिक, एनजीओ प्रतिनिधी, एसीपी, पोलिस निरीक्षक, आणि मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. सुधाकर पठारे यांचे कार्य आणि त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी डॉ. सुधाकर पठारे यांच्या नेतृत्वात शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. त्यांनी शहरातील नागरिक आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने, शहरात व्यापारी वर्गाला सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात डॉ. पठारे यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. त्यांनी असेही सांगितले की, डॉ. पठारे यांच्या कार्यकाळात उल्हासनगर शहरात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे.
डॉ. सुधाकर पठारे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या कार्यकाळातील विविध अनुभवांवर चर्चा केली. त्यांनी अंबरनाथ एमआयडीसी येथील गोळीबार प्रकरणातील कठोर कारवाईची आठवण करून दिली, ज्यात आरोपींवर मोक्का कलम लावण्यात आले होते. यानंतर अंबरनाथ शिवमंदिर प्रांगणात शिव आर्ट महोत्सवातील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस दलाला मोठे आव्हान होते. त्यावेळी काही लोक जखमी झाले, परंतु मोठा अनर्थ टाळण्यात यश मिळाले. हाजी मलंग यात्रा बंदोबस्तात १२ किलोमीटरच्या परिसरात १० दिवस १००० पोलिसांचे बंदोबस्त व्यवस्थापन करणे हे आणखी एक आव्हान होते, जे त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. त्यांनी पूज्य चालिया उत्सव, गणेशोत्सव, शिव महोत्सव यांसारख्या उत्सवांच्या बंदोबस्ताचे अनुभवही शेअर केले. आपल्या समारोप भाषणात डॉ. पठारे यांनी उल्हासनगरच्या खास औद्योगिक वैशिष्ट्यांवर भर देत म्हटले, “जर मेक इन इंडिया साठी कुठल्या शहराला ब्रँड अँबेसडर म्हणून निवडायचे असेल, तर ते उल्हासनगरच असायला हवे. येथे गल्लीगल्लीत उद्योग आहेत, आणि उद्योगधंद्यांमध्ये काहीतरी करण्याची प्रचंड क्षमता आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. सुधाकर पठारे यांचा शाल, पुष्पगुच्छ, आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला आणि त्यांच्या अविस्मरणीय सेवांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. पठारे यांनीही उल्हासनगरकरांच्या सहकार्याचे आभार मानले आणि इतर सण – उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *