गोव्याच्या मामगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) मार्च 2025 पर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी टर्मिनल बांधण्याची घोषणा केली आहे. 2023-2024 या वर्षात क्रूझ प्रवाशांच्या संख्येत 40 टक्कयांनी वाढ अपेक्षित आहे आणि ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एका वरिष्ठ ‘एमपीए’ अधिकाऱ्याने सांगितले की आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल्स आणि संबंधित सुविधांच्या विकासामुळे पर्यटन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 2020 पासून कोरोनामुळे गोव्याच्या पर्यटनावर खूप वाईट परिणाम दिसून आला; परंतु गेल्या चार वर्षांपासून मंदीशी झुंजत असलेल्या गोव्याच्या पर्यटन उद्योगात देशी-विदेशी पाहुण्यांचा ओघ आता झपाट्याने वाढला आहे. हे पाहता हे क्रूझ टर्मिनल बांधण्यावर भर देण्यात आला असून ते पुढील वर्षी पूर्ण होईल. गोव्यात झालेल्या सागरी राज्य विकास परिषदेच्या बैठकीदरम्यान, ‘एमपीए’च्या अधिकाऱ्याने सांगितले की जागतिक क्रूझ जहाज वाहतुकीतील तेजीमुळे मार्मुगाव बंदरात क्रूझ जहाजांची आवक झपाट्याने वाढली आहे आणि भविष्यात त्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित अत्याधुनिक इमारतीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल्स असतील.
अधिकाऱ्याने सांगितले की नव्या सुविधेत प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाईल. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये 24 इमिग्रेशन काउंटर, 10 चेक-इन काउंटर, एक वेटग लाउंज आणि इतर सुविधा असतील. टर्मिनलमध्ये ड्युटी फ्री रिटेल शॉप, लाउंज, फूड कोर्ट आणि इतर सुविधाही असतील. गोवा हे नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण राहिले आहे. येथील पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे संकटाचा सामना करावा लागला. पर्यटकांच्या संख्येतही 90 टक्कयांहून अधिक घट नोंदवली गेली. यानंतर गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने कोरोना महामारीवर मात करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय चार्टर सहाय्य’, ‘पर्यटन व्यापार सहाय्य’ अशा अनेक योजना सुरू केल्या. या सर्व सरकारी प्रयत्नांनंतर येथील समुद्रकिनारे पुन्हा एकदा देशी-विदेशी पाहुण्यांनी गजबजलेले दिसू लागले आहेत. 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये येथे येणाऱ्या क्रूझ जहाजांच्या संख्येत 15 टक्के आणि प्रवाशांच्या संख्येत 40 टक्कयांनी वाढ झाली आहे.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी सुमारे 20 टक्के पर्यटकांची पहिली पसंती गोवा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी-नोव्हेंबर 2023 दरम्यान 4.03 लाख परदेशी पर्यटक गोव्यात आले. त्याच वेळी, गोवा सरकारच्या पर्यटन विभागानुसार, 2019 मध्ये सुमारे 71 लाख देशी पर्यटक आणि सुमारे 10 लाख विदेशी पर्यटक गोव्यात आले होते.