४४ लाखांची वीजचोरी उघड
कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरू आहे. उपविभागातील सर्वाधिक गळती असलेल्या वीज वाहिनीवर गेल्या दीड महिन्यात केलेल्या तपासणीत १८४ जणांकडे ४४ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. या सर्व १८४ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. चंद्रमणि मिश्रा आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत टिटवाळा मंदिर, बल्याणी, बनेली, मांडा पश्चिम भागात १३४ तर गोवेली शाखेंतर्गत म्हारळ व वरप भागात ५० जणांकडे वीज चोऱ्या आढळून आल्या. यात वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ४० ग्राहकांचा समावेश आहे. टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे आणि त्यांच्या टिमने ही कामगिरी केली.
