श्रद्धांजली

प्रसाद मोकाशी

‘राज’बिंडा लढवय्या त्याच्याकडे पाहिलं किंवा किमान त्याच्याशी बोललं की एक वेगळी ऊर्जा मिळत असे. त्याला नेहमी हेच म्हणत असे आणि तो फक्त एक मंद स्मित करून सोडून देत असे. त्याच्यावर अनेकदा लिहावं असं मनापासून वाटत होतं. पण त्याच्यावर लिहिताना नेमकं काय शोधावं हाच प्रश्न कायम पडत राहीला. त्याच्यावर इतक्या लवकर असा लेख लिहावा लागेल असं मनात कधीच आलं नव्हतं. शाळेपासून म्हणजे नेमका कधीपासून? जवळपास ५० वर्षांपूर्वी त्याच्याशी ओळख झाली. प्रथमपासूनच तो नावाप्रमाणेच राजीव होता. एक सालस आणि राजबिंड व्यक्तिमत्व. त्याच्या चेहे-याकडे पाहलं की कसं प्रसन्न वाटायचं. त्याचं स्मितहास्य तर वेगळंच असे. त्या हास्यात नेमकं काय असेल हे कळायचं नाही. पण त्याच्या त्या हळुवार स्वभावामुळे आणि राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे अनेकांना तो आपला मित्र असावा, असं वाटत असे. शाळेत नेहमीच सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा तो शाळूसोबती होता. त्याच्या पायात काहीतरी दोष होता. पण तरीही तो चांगला खेळाडू होता. त्याचे क्रिकेट प्रेम हे वर्गामध्ये सर्वांनाच ठाऊक असे. इमारतीमधली त्याची मित्रमंडळी आणि तो अनेकदा क्रिकेटचे सामने बघायला जात असत आणि दुस-या दिवशी संपूर्ण वर्गामध्ये तो त्याच्या मित्रांना तिथलं रसभरीत वर्णन करायचा. त्याला गप्पा मारायला खूप आवडत असे. पण तसा तो काहीसा मितभाषीही होता. त्याच्या स्वभावामध्ये हा संमिश्रपणा दडला होता. पण तो अनेकदा मित्रांमध्ये अचानक अलिप्तही होत असे. आपल्या मनाची कवाडं कधी उघडायची आणि कधी मिटायची हे त्याच्याकडून शिकून घ्यावं. नंतर कॉलनीतला तो एक चांगला मित्र झाला. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तो माझ्याकडे यायचा आणि माझ्या घरातल्यांशी छान गप्पा मारायचा. त्याच्या मंडळामध्ये तो एक चांगला फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. नौदलातील नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो सकाळी ६.३० वाजता ट्रेन पकडून तेव्हाच्या व्हीटीला जात असे. तेव्हा नेहमीच तो आणि मी सोबत असू. कधी लवकर स्टेशनवर गेला तर माझी वाट पहात थांबत असे. ‘अरे तुला कामावर जायला उशीर होईल,’ असं म्हटलं की तो ‘जाऊ दे रे. तुझ्याबरोबर गप्पा मारत प्रवास करायला आवडतं,’ असं म्हणायचा. अनेक विषयांवर दररोज सकाळी गप्पा मारत आमचा ट्रेनचा प्रवास पूर्ण व्हायचा. ट्रेनमधून उतरल्यावर मात्र तो घाईघाईने भरभर पुढे निघून जात असे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात अचानक काळे ढग गोळा झाले. एकापाठून एक तो व्यक्तिगत आयुष्यामध्ये संघर्ष करू लागला. एक राजबिंडा लढवय्यं व्यक्तिमत्व सर्वांसमोर आलं. त्याच्या मोठ्या मुलाच्या अचानक निधनानंतर त्याच्यामागे संकटांची मालिकाच लागली. तो एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरा गेला आणि तिथेच त्याच्या राजबिंड्या आयुष्याला ग्रहण लागलं. एकामागून एक शस्त्रक्रिया त्याच्या पायावर झाल्या आणि अचानक तो कमरेतून वाकला. वयस्कर व्यक्ती चालावी तसा हातात काठी घेऊन तो वयाच्या ऐन पस्तीशीमध्ये चालू लागला. समोरून कोणी आलं तर त्याला मान वर करणे शक्य होत नव्हते. सतत औषधांचा मारा त्याच्यावर होऊ लागला तरी तो डगमगला नाही. कॉलनीत तो समोरून आला की त्याला हाक मारल्यावर त्याचा नेहमीचा हसरा चेहरा (सुदैवाने त्याचा चेहरा तसाच राजस होता) ‘बोल कसा आहेस,’ म्हणत तो थांबायचा. हातातली काठी मागे घेत त्याच्यावर रेलून तो बोलत उभा रहायचा. ‘अरे तुला त्रास होईल ना’ असं म्हटलं की तो हसायचा आणि ‘नाही रे’ म्हणत पुढे गप्पा सुरू करायचा. आपल्या आजाराबाबत बोलणं त्याला आवडत नसे. आपल्या मित्रांना एकत्र करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असे. त्याच्याच धडपडीतून मित्रांना जमविण्यासाठी प्रथम दिवाळी पहाट त्याने आयोजित केली. कधी होळी करण्यासाठी शाळेतील सगळ्या मित्रांना गोळा करत त्यांना इडली चटणी खाऊ घातली. मित्रांसाठी त्याच्या आयुष्यात एक खास स्थान होते. त्यातही कधी तो फक्त आणि फक्त माझ्याबरोबर अनेक खास गप्पा मारत असे. दिवाळी पहाटमधून जमलेले पैसे उरले तेव्हा त्याने माझ्यासोबत एक प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आपण आपलं आयुष्य जगलो आता समाजासाठी काहीतरी करूया म्हणत त्याने आपला विचार मांडला आणि विहंग प्रतिष्ठान सुरू झालं. आपलं प्रतिष्ठान हे केवळ मौजमजेसाठी नाही, तर आपण सामाजिक उपक्रम राबविले पाहीजेत असे त्याचं म्हणणं असे. त्यातूनच मोबाइल टॉवरमधून होणारे विकीरीकरण रोखण्यासाठी जनजागृती व्याख्यान आयोजित केले. नंतर पतंगोत्सवाच्या माध्यमातून एका मुलीच्या वैद्यकीय उपचारांसाठी निधी उभा करताना संस्कृती आणि बांधिलकी यांची एकत्र सांगड घालून दाखवली. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्याने अवयवदानासाठी घेतलेला पुढाकार. अवयवदानासाठी त्याने सर्वात प्रथम अर्ज दाखल केलाच पण वारंवार त्यासाठी अनेक ठिकाणी अवयवदान व्हावे यासाठी आवाहन केले. विहंगच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये धावपळ करणे त्याला शक्य नसे पण एका जागी दोन खुर्च्या एकावर एक टाकून तो बसायचा किंवा हातातली काठी मागे घेत त्यावर रेलून प्रत्येक कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पडतो की नाही, हे पाहत असे. काही राहीले तर लगेच हाक मारून हे कर असं आग्रहाने सांगत असे. कधीकधी तर पाहुण्यांसाठीचे पुष्पगुच्छ आणायचे राहीले किंवा पाण्याच्या बाटल्या राहील्या तर लगेच स्वारी स्वत: धावपळ करून ते आणायला जात असे. उपक्रमासाठी निधी उभा करायचा झाला की हा लगेच एका जागी बसून सर्वांना फोन करत असे आणि त्याच्या शब्दावर अनेकांकडून निधी मिळत असे. शाळेतल्या मुलांना दत्तक घेताना त्याचे नियम ठरवायचे काम त्याने केले होते. आपल्या मनाविरुद्ध काही झालं तरी तो चिडत नसे. आपली नाराजी मात्र तो ठामपणे व्यक्त करत असे. नाराजी व्यक्त करून झाल्यावर तो पुन्हा सगळ्यांसोबत पहिल्यासारखाच कामात झोकून देत असे. त्याला शारीरिक अडचणी होत्या. अनेक औषधांनी तो बेजार झाला होता. पण तो कधी दुर्मुखला नाही. त्याच्या कार्यालयामधील स्नेहसंमेलनात त्याच्या पत्नीने अवयवदानावर छोटेसे नाटक सादर केले आणि त्याला सर्वांनी गौरविले तेव्हा ते नाटक पाहताना एका कोप-यात उभे राहून डोळे पुसणारे हे राजबिंडे व्यक्तिमत्व किती हळवे आहे हे पाहीले. औषधांच्या मा-यांनी त्याची मुत्रपिंडं पूर्णपणे खराब झाली आणि तो डायालिसिसवर गेला. त्याला होणारा त्रास सर्वांना दिसत होता. पण तो, त्याची पत्नी आणि मुलगी कधीही वैतागलेले, दुर्मुखलेले दिसले नाहीत. त्याची तब्येत बिघडायची तेव्हा ऐन मध्यरात्री त्याची पत्नी आणि मुलगी त्याला एकटेच इस्पितळात नेत. पण कोणाला काही कळवत नसत. मात्र दुस-या दिवशी ‘अरे काल सांगायचं राहून गेलं,’ म्हणत हस-या आवाजात आपल्या इस्पितळवारीचं वर्णन करायचा. ‘अरे तुला काय इथलं वातावरण इतकं आवडतं का’ असे विचारलं की हळूच हसत म्हणायचा ‘असे तसं नाही रे, पण थोडा त्रास झाला.’ वारंवार इस्पितळात जाणे त्याच्या कुटुंबाच्या जणू अंगवळणीच पडलं होतं. करोना काळामध्ये त्याच्या वाढदिवशीच त्याची आई वृद्धापकाळामुळे गेली तेव्हाही तो शांत होता. खांद्यावर डोकं ठेवून संध्याकाळी त्याने त्याच्या भावनांना वाट करून दिली तेव्हा जाणवलं की त्याच्यामध्ये हळवं मन दडलंय. त्याच्या मनामध्ये एक हळवा कोपराही होता. तो त्याने कधीच उघड केला नाही. त्याच्या पत्नीने त्याला आपले एक मूत्रपिंड देण्याचा निर्णय खंबीरपणे घेतला तेव्हाही तो नाहीच म्हणत होता. पण आपल्यामुळे पत्नीला होणारा त्रास कमी होईल म्हणून त्याने तयारी दाखवली. सगळ्या चाचण्या झाल्या आणि अखेर त्याची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्याने बरीच सावधानता बाळगली. कोणाला भेटायचं नाही, सार्वजनिक समारंभात जायचं नाही, अन्यथा जंतुसंसर्ग होईल अशी भीती त्याला होती. खरंच होतं ते. पण मग आपण मित्राच्या मदतीने सुरू केलेल्या विहंगचे उपक्रम आपण कसे पाहणार, त्यात सहभागी कसं होणार याचीही त्याला चिंता पडलेली असे. मग सतत कार्यक्रम सुरू असताना मित्रांना व्हीडीओ कॉल करून त्यावरून तो कार्यक्रम योग्य चालला आहे ना याची खात्री करत असे. डेंग्युमुळे अतिदक्षता विभागात असतानाही त्याने विहंगचा कार्यक्रम व्हीडीओवर पाहीलाच पण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्याने त्याच्या पत्नीला आणि मुलीला खास पाठवलं. त्याचा विहंगवर प्रचंड जीव होता. जुलै महिन्यापर्यंत सर्व काही ठीक चालले होते. नव्याने मिळालेल्या जीवदानावर तो खुश होता. सगळे काही सुरळीत असताना अचानक त्याला डेंग्यू झाला. प्रथम एका नंतर दुस-या इस्पितळात त्याच्या फे-या सुरू झाल्या. त्यातून सावरून घरी आला आणि पहाटे झोपेतून उठताना चादरीत पाय अडकण्याचं निमित्त झालं. त्याचा गुडघा फुटला. त्याला तातडीने इस्पितळात नेलं. त्याच्या नाजूक प्रकृतीमुळे पायाला प्लास्टर घालणं शक्य नव्हतं. वेदना होत होत्या. पण चेह-यावर त्याची साधी दुखरी खूण नव्हती. त्याला इस्पितळात भेटलो तेव्हाही ‘अरे तुम्ही तसे मला कधी भेटायला येणार’ म्हणत हसूनच गप्पा झाल्या. पण यावेळी गप्पा कमी झाल्या. दोन दिवसांनी घरी आला. आता सगळं बरं होईल वाटत असतानाच त्याचा एका दुपारी फोन आला. ‘काय करतोयस? मला भेटायला ये.’ ‘का रे काय झालं.’ ‘नाही ये भेटायला.’ बहुदा घरात एकटा असेल म्हणून गप्पा मारायला बोलावत असेल असे मनात येतानाच त्याच्या पत्नीचा आवाज आला. ‘अहो त्याला कशाला बोलवताय.’ त्याने फोन कट केला. काही तरी महत्वाचं असणार म्हणून त्याच्या घरी गेलो तर तो झोपला होता. ‘रात्रभर डोकेदुखीमुळे तो जागा होता,’ पत्नीने सांगितलं. ‘त्याचं डोकं दुखत होतं आणि तुला चेपायला बोलावत होता. मी त्याला रागावले तर तो माझा मित्र आहे मी त्याला हक्काने बोलवीन,’ असं सांगताना त्याने मैत्री किती घट्ट आहे हेच दाखवून दिलं. दोन दिवसांनी त्याची डोकेदुखी प्रचंड वाढली. त्याला तातडीने इस्पितळात नेलं. त्याला पहायला गेलो. तर बघ मी तुझी आठवण काढली होती असं म्हणून तो गप्पं झाला. शनिवारी गणपती आले. दुस-या दिवशी सकाळीच त्याच्या मुलीचा फोन आला. काका लगेच ये. नितीन आणि मी तातडीने इस्पितळात गेलो. अरे तो बोलत नाही, डोळे उघडत नाही, त्याची पत्नी म्हणाली. आम्ही त्याला पहायला अतिदक्षता विभागात गेलो. जणू काही आमच्या येण्याचीच तो वाट पहात होता. काही क्षण नजरानजर झाली आणि त्याने डोळे मिटून घेतले. थोड्याच वेळात एक राजबिंड लढवय्यं व्यक्तिमत्व शांत झालं होतं. मैत्रीचा हात अचानक सुटला होता. जीवन संघर्षात आता मी तुझ्या सोबत आहे, तू लढ असं म्हणत पाठीशी असणारा मित्र इतक्या घाईघाईने पुढे कधी गेला कळलंच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *