नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 2 ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा स्वच्छ भारत मिशनच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असून या अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे.
यामध्ये बेलापूर विभागातील टिएस चाणक्यच्या पाठीमागील परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या सखोल स्वच्छता मोहीमेत स्वच्छतामित्रांसमवेत ज्ञानदीप सेवा मंडळाचे आरएसपी विद्यार्थी, डीवायपाटील विद्यापीठाचे एनसीसी कॅडेट, टिएस चाणक्य मरिन युनिव्हर्सिटीचे स्वयंसेवक यांनी उत्साही सहभाग घेतला व हा परिसर स्वच्छ केला.
अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार तसेच शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व डॉ संतोष वारुळे यांच्या नियंत्रणाखाली विविध शाळांमध्ये स्वच्छताविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत नेरुळ येथील एपीजे शाळेमध्ये राष्ट्रीय शांतता दिवस साजरा करताना विद्यार्थ्यांना शांततेसोबतच दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. नेरुळ विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. अशाचप्रकारे नेरुळ विभागात से.18 नेरुळ येथील विद्याभवन शाळेमध्ये ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेत स्वच्छतेविषयी आपले विचार निबंधातून मांडले. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 सेक्टर 4 नेरुळ याठिकाणीही मुख्याध्यापिका श्रीम. सुशीला कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कोपरखैरणे विभागातील नमुंमपा शाळा क्रमांक 36 याठिकाणी ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ विषयावरील निबंध स्पर्धेत मुख्याध्यापिका श्रीम. संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी श्री. राजुसिंग चव्हाण यांच्यामार्फत शाळेमध्ये स्वच्छता विषयक जाणीव जागृती करण्यात आली.
स्वच्छता ही सेवा पंधरवडयात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये लोकसहभागात विद्यार्थी सहभागावर विशेष लक्ष देण्यात येत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करण्यात येत आहे.