‘आंबेडकरवादी भारत मिशन ‘चे आवाहन
मुंबई : २०११ च्या जनगणनेत राज्यात जातीची नोंद केलेल्या आणि न केलेल्या बौद्ध बांधवांची एकत्रित लोकसंख्या १ कोटी इतकी आहे. त्याप्रमाणे विधानसभेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकूण २९ जागांपैकी २० जागांवर बौद्धांचा ‘ हक्क ‘ आहे, असे नमूद करत महाविकास आघाडीकडे तसा दावा करण्याचा निर्णय आंबेडकरवादी भारत मिशनने घेतला आहे. या मुद्द्यावर मुंबईत लवकरच बौद्धांचा एक मेळावा घेण्याचेही ठरवण्यात आले आहे.
अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक म्हणजे ८० टक्के लोकसंख्या असूनही विधानसभेत सध्या फक्त ८ आमदार बौध्द आहेत, याकडे एका पत्रकाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
पवार, ठाकरे, खारगे यांना भेटणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांना एका निवेदनाद्वारे बौद्ध समाजाचा हा ‘ दावा ‘ सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्धांचे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ महाविकास आघाडीच्या धुरिणांची भेट घेणार आहे.
२० जागांचा फॉर्म्युला
विधानसभेच्या १२ जागांवर शिवसेना ( उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी ( शरद पवार) आणि काँग्रेस यांनी त्यांच्या पक्षातील प्रत्येकी ४ सक्षम बौध्द कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. ८ जागा महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या आंबेडकरवादी संघटनांमधील उमेदवारांसाठी विजयाची क्षमता या निकषावर सोडाव्यात. तसेच विधान परिषदेच्या ३ जागांवर बौध्द समाजातील विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, कलावंत, माजी सनदी अधिकारी यांना संधी द्यावी, यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे.
बौद्ध समाजाची ताकद निर्णायक
बौद्ध समाजाची ताकद ही राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १८९ जागांवर निर्णायक आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही हे सिद्ध आलेले आहे. १९९० च्या निवडणुकीत बौद्ध समाजाच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसला हातची सत्ता राखण्यात यश आले होते. तर, रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती सरकारला बौद्ध समाजाने सत्तेतून हद्दपार केले होते, याची आठवण पत्रकातून करून देण्यात आली आहे.
आंबेडकरी समाजाची जनभावना काय?
१) जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘ इबीसी ‘ आणि ‘ ओबीसी ‘ या वर्गांना दिलेली सहा महिन्यांची मुदत अनुसूचित जातींना भाजप आणि मित्र पक्षांनी जाणूनबुजून नाकारली आहे. त्यामुळे सुमारे २ लाख दलित विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुकावे लागले आहे.
२) शिष्यवृत्ती, फेलोशीपअभावी एससी विद्यार्थ्यांची नेहमीच ससेहोलपट सुरू आहे.
३) भीमा – कोरेगाव येथे आंबेडकरी समाजाला लक्ष्य करत घेरून करण्यात आलेले हल्ले आणि माजवलेल्या हिंसाचारानंतर फडणवीस सरकारने खोटे गुन्हे दाखल करून दलित बांधवांनाच खटल्यांमध्ये अडकवले आहे. ते खटले त्वरित काढून घेण्याची नितांत गरज आहे.
४) राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ( ७ मे २०२१ पासून) अनुसूचित जाती – जमातींचे बढती ( प्रमोशन) मधील आरक्षण बंद करण्यात आलेले आहे. ते पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.
५) भूमिहीनांना जमीन वाटपासाठी राज्यात असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना कागदोपत्री अस्तित्वात आहे. तिची प्रभावी अंमलबावणी करून जमिनींचे वाटप होणे आवश्यक आहे.
६) गायरान जमीन धारकांच्या अतिक्रमणाचे दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ते तातडीने निकाली काढण्याची गरज आहे.
७) महाराष्ट्राच्या एकूण बजेटपैकी अनुसूचित जातींच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मंजूर करून त्याचा १०० टक्के विनियोग करणे राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आले पाहिजे. त्यासाठी विधिमंडळात कायदा संमत करण्याची आवश्यकता आहे.
दलित समाजात या आणि अशाच अनेक ज्वलंत प्रश्नांवरून कमालीचा असंतोष आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्याचे भाजपप्रणीत सरकार हटविण्याशिवाय तरणोपाय नाही, अशी भूमिका आंबेडकरवादी भारत मिशनने घेतली आहे.
राज्यात परिवर्तनाचे उद्दिष्ट
राज्यातील बौद्ध – आंबेडकरी समाजातही तीच जनभावना प्रखर आणि प्रबळ झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप – मित्र पक्षांना १७ जागांवर रोखण्यात यश आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हटवून राज्यात
‘ परिवर्तन ‘ घडवण्याची संधी हाताशी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आंबेडकरवादी पक्ष – संघटना यांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन आंबेडकरवादी भारत मिशनने केले आहे. त्यासाठीचे हे आवाहन पत्रक राज्यातील खालील आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
१) दलित पँथर नेते सुरेश केदारे
२) प्राचार्य रमेश जाधव
३) ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे
४) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ
५) शिक्षण तज्ज्ञ डॉ.जी.के. डोंगरगावकर
६) माजी प्राचार्य ॲड. जयमंगल धनराज
७) बँक कर्मचारी नेते सतीश डोंगरे
८) प्रा. एकनाथ जाधव
७) पत्रकार प्रशांत रूपवते
८) पत्रकार जयवंत हिरे
९) माजी उप नगराध्यक्ष प्रकाश कांबळे पूर्णा, परभणी
१०) छाया खोब्रागडे, नागपूर
११) प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, लातूर
१२) ॲड. हर्षल शाक्य
१३) प्रा.गौतम निकम, जळगाव
१४) सतीश गायकवाड, पुणे
१५) यु.डी.गायकवाड
१६ ) डाॅ.प्रा. अशोक नारनवरे
१७) श्रीहरी कांबळे
१८) प्रा. डॉ. सतीश वाघमारे
१९) डॅा प्रज्ञावंत देवळेकर
२०) डॅा सुदाम राठोड
२१) प्रा तुषार भोसले
२२) डॅा गौतम बनसोडे
२३) प्रा जगदीश गाणार
२४) प्रा विजय गायकवाड
२५) सिद्धार्थ जगदेव
२६) डॅा निळकंठ शेरे.
२७) मयुर लंकेश्वर
२८) डॅा अनिल सपकाळ
२९) प्रा. जयसिंग वाघ, जळगाव
३०) प्रकाश हिवाळे
३१) राहुल साळवे, छत्रपती संभाजी नगर
३२) सुरेश साबळे, बुलढाणा
३३ ) प्रा. प्रतिभा अहिरे, कन्नड
३५) पत्रकार महेश गायकवाड, सोलापूर
