मुंबई, ता. २१ : महावितरणकडून राज्यभरातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. अनुसूचित जाती घटकांना या दरात दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून ४२ कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वीजबिल थकबाकीचा सामना करणाऱ्या महावितरणला दिलासा मिळणार आहे.
कृषीपंप ग्राहकांना वीजबिलात सवलत योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने ११५ रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार महावितरणही सातत्याने अनुसूचित जाती घटकातील कृषीपंपधारक ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवते. त्यामुळेच सरकारने या बिलाची रक्कम महावितरणला देण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, महावितरण इतर गटांतील वीज ग्राहकांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करते; मात्र सवलतीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.
