अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर
मुंबई : वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजता आझाद मैदानावर समितीमधील ७ घटक संघटनांचे २५ नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज १५० अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. २५ सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राज्यभरातील अंगणवाडीसेविकांना ३ हजार, मदतनिसांना २ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत.
गिरणी कामगार देखील आंदोलन करणार
गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. २६ सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारतमाता, लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत, तर २ ऑक्टोबर रोजी गिरणगावात लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मफतलाल मिलसमोर खटाव मिलची जमीन मिळावी, मफतलाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी, घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टॉवरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
