स्थानिकांसमोर यक्षप्रश्न !
माथेरान : माथेरान मध्ये बहुतेक ठिकाणी प्लास्टिकजन्य कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत दिसत असून स्वच्छ माथेरान, हरित माथेरान,सुंदर माथेरान ही बिरुदावली हळूहळू लोप पावत चाललेली असल्याने या नयनरम्य पर्यटनस्थळाची प्रतिमा काही वर्षांपासून इथे वाढत चाललेल्या वस्तीमुळे त्याचप्रमाणे जिकडेतिकडे पॉईंट तसेच रस्त्याच्या बाजूला नजर जाईल तिकडे टपऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या तसेच रॅपेर्स पाकीट जंगलात कुठेही टाकली जात आहेत.यामुळे या गावाच्या भविष्यातील पर्यटनाबाबत स्थानिकांना यक्षप्रश्न पडलेला दिसत आहे.अनेक ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने जंगलात आणि नागरी वस्तीत सुध्दा मोठया प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन कामी दरवर्षी जवळपास एक करोड रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला जात आहे. परंतु या व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार खरोखरच आत्मीयतेने आपल्या कामाला न्याय देतात का हा सुद्धा प्रश्न स्थानिकांना सतावतो आहे. प्लास्टिक जन्य कचऱ्यामुळे अनेक झाडे दगावत असून याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. झाडी हळुहळु लोप पावत असल्याने इथला हवेतील गारवा पूर्णपणे संपुष्टात आल्याने याठिकाणी बाराही महिने पंखा लावल्याशिवाय राहणे कठीण बाब बनली आहे.इथल्या पर्यटन वाढीच्या विकास कामाला आडकाठी आणणाऱ्या पर्यावरण वाद्यांना या बाबी निदर्शनास येत नाहीत परंतु भूमिपुत्रांच्या न्याय हक्कावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर, मूलभूत सेवासुविधा तसेच अत्यावश्यक गरजेच्या सोयींवर गदा आणण्यासाठी मुंबई स्थित पर्यावरण वाद्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का ? असाही प्रश्न युवा वर्गातून उपस्थित केला जात आहे.घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचे कामगार नियोजित कामे पूर्ण करीत नसतील तर अशा ठेक्यासाठी करोडो रुपये नाहक खर्च का केला जात आहे. यापेक्षा येथील जे कुणी सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत ज्यांना खरोखरच या गावाविषयी तळमळ आहे आपले गाव कायमस्वरूपी हरित सुंदर आणि स्वच्छ असावे ही मनोवृत्ती ज्या होतकरू युवकांमध्ये आहे अशाना हा ठेका सुपूर्द करण्यात यावा जेणेकरून नगरपरिषदेची आर्थिक बचत आणि हा सर्व पैसा गावात राहू शकतो असेही स्थानिकांमधून बोलले जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन कामे असोत किंवा नगरपरिषदेच्या कायम असणाऱ्या कामगार वर्गाची स्वच्छता बाबतीत कामे असोत ही सर्व नियोजन पद्धतीने केली जात आहेत की नाही त्याचप्रमाणे हे सर्वच कामगार स्वेच्छेने कामात पुढाकार घेत आहेत की फक्त पगारापूरता कामे करत आहेत यावर अंकुश राहण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक शासनाने करणे गरजेचे आहे अन्यथा ह्या स्थळावर भविष्यात कुणीही फिरकणार नाही याचा फटका स्थानिकांनाच सोसावा लागणार आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषदेप्रमाणे वनखात्याची, वन संरक्षण समितीची सुध्दा जबाबदारी आहे. ही वनसंपदा टिकून राहण्यासाठी या खात्यानी बारकाईने लक्ष केंद्रित करून माथेरान मधील विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा तारेचे कंपाउंड केल्यास खऱ्या अर्थाने वृक्ष जतन केले जाऊ शकते अन्यथा हे स्थळ कायम हरित राहील याची शाश्वती देता येणार नाही असा जेष्ठ नागरिकांमधून सूर ऐकावयास मिळत आहे.
