मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम : मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

 

मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने शक्ती प्लॅस्टिक कंपनीच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये प्लॅस्टिक द्या, टी-शर्ट, पेन अशा वेगवेगळ्या उपयोगी वस्तू मिळवा. या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेकडून कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार मेसर्स शक्ती प्लॅस्टिक कंपनीशी केला आहे.
मध्य रेल्वेने मुंबई विभागातील निवडक स्थानकांवर प्लॅस्टिक कचरा कमी करण्यावर आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन उपायांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करून मेसर्स शक्ती प्लॅस्टिक इंडस्ट्रीजसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सीएसएमटी स्थानक आणि वाडीबंदर डेपो येथे कचरा व्यवस्थापन वाढविण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
हा उपक्रम १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांकडून प्लॅस्टिक घेऊन त्याऐवजी प्रवाशांना टी-शर्ट, मोबाईल स्टँड, पेन अशा वस्तू देण्यात येत आहेत. गेल्या पाच दिवसांत स्टॉलवर अनेक प्रवाशांनी भेट देत असून उत्सुकतेने विचारपूस करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा मिळणार वस्तू
दहा प्लॅस्टिक बॉटलवर एक पेन, एक किलो प्लॅस्टिकवर एक मोबाईल स्टँड, दोन किलो प्लॅस्टिकवर पुश बिन, २० किलो प्लॅस्टिकवर एक टी शर्ट एक पुश बिन अशा अनेक उपयोगी वस्तू मिळणार आहेत. १६ सप्टेंबर २०२४ पासून अनेकांनी प्लॅस्टिक देऊन वस्तू घेत असल्याची माहिती शक्ती प्लॅस्टिक कंपनीचे कर्मचारी तन्मय भोसले यांनी ‘सकाळ’ला दिली आहे.
काय आहे करार?
सामंजस्य कराराच्या अटींनुसार, मध्य रेल्वे मेसर्स शक्ती प्लॅस्टिकला सीएसएमटी स्थानकावर आणि वाडीबंदर डेपोवरील गाड्यांमधून मिळणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन, विलगीकरण आणि पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक जागा आणि परवानग्या प्रदान करणार आहे. मेसर्स शक्ती प्लॅस्टिक पुनर्नविनीकरण केलेल्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू, जसे की बेंच आणि कचरापेटी प्रदान करून उपक्रमाला हातभार लावणार आहे. याचा वापर सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केला जाणार आहे. या सहयोगी प्रयत्नामुळे केवळ स्थानकांवर कचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर बृहन्मुंबईच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था/महानगरपालिका (यूएलबी/एमसीजीएम)वरील विल्हेवाटीचा भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *