पोलिसांनी तीन गोळ्या ठोकल्या

एनकाऊंटर बोगस असल्याचा विरोधकांचा आरोप

ठाणे : बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्या मुलिंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला. पोलिस व्हॅनमध्येच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न असताना स्वरंक्षणासाठी पोलिसांनी त्याला तीन गोळ्या घातल्या असा प्राथमिक रिपोर्ट आहे.

ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात या आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. तसेच सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत.

ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन असताना मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या वाहनातच घडला.

काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांची क्राईम ब्रॉंच टीमने त्याला ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला यात तो ठार झाला.

“माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं”

अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश

माझा पोरगा असे नीच कृत्य करूच शकत नाही. तसं कृत्य जर त्याने केले असते तर तो परत शाळेत कशाला कामाला गेला असता. कुणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं असा आक्रोश करीत अक्षयच्या आईने हंबरडा फोडला.

साधं रस्ता क्रॉस करतानाही तो सोबत असणाऱ्याचा हात पकडायचा. एवढं माझं पोर घाबरट होतं. तो कशाला पोलिसांची बंदूक हिसकावून घेईल. त्याला यांनी मारलेय. त्याच्या हातामध्ये कुठले तरी पेपर होते, त्याला लिहून दिलेले. तो दाखवत होता मला. पण, मला काही समजत नाही. आम्ही शिकलेलो नाही. मी बोलले पोराला मला वाचता येत नाही. पैसे देऊन मारून टाकलं माझ्या पोराला. मला न्याय द्या. नाहीतर आम्ही तिथे येऊ, आम्हाला पण गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार आहे”, असे अक्षय शिंदेची आई म्हणाली.

 “अक्षय शिंदेला तुम्ही का घेऊन येत नाही, असे पोलिसांना बोलले, त्यावेळी पोलीस मला म्हणाला, ‘अक्षय शिंदेला इथं बघितलं तर मारून टाकतील. म्हणून त्याला घेऊन यायला माणसं लागतात. त्याचा रिपोर्ट मोठा आहे’, असे बोलत होते ते. मी पोरासोबत बोलले पण, पोरगा बोलला की मम्मी चार्जशीट पण आलेली नाही. मला केव्हा सोडवता? मी बोलले बाबा थांब जरा बघू आपण”, असे अक्षय शिंदेच्या आईने सांगितले.

अक्षयची बाजू घेणे दुर्दैवी- मुख्यमंत्री शिंदे

ज्या व्यक्तीने लहान मुलींवर अत्याचार केला, ज्याने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले, अशाप्रकारच्या आरोपीची विरोधी पक्षाने बाजू घेणे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या असे हेच विरोधक म्हणत होते. त्यामुळे आता त्यांनी असे बोलणे निंदनीय आहे. या घटनेत एपीआय दर्जाचा पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. जे पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास कर्तव्यावर असतात, त्यांच्यावर विरोधकांनी आक्षेप घेणे दुर्दैवी आहे. पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा तपास होईल आणि समोर येईल. निवडणुकीचा याच्याशी संबंध नाही. विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. म्हणून ते असे आरोप करत आहेत,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विरोधक राजकारण करत आहेत – देवेंद्र फडणवीस

 “विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं. हा तोच विरोधीपक्ष आहे, जो आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता. मात्र, आता आरोपीने पोलिसांवर गोळाबार केला, तेव्हा विरोधीपक्षाकडून आरोपीची बाजू घेतली जात आहे. हे चुकीचं आहे”, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गृहविभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद- शरद पवार

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे. असं शरद पवार म्हणाले.

बदलापूरचे एन्काऊंटर बोगस; फडणवीसांनी राजीनामा द्यावा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

बदलापुरचे हे एकन्काऊंटर बोगस आहे. इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे करण्यात आलं. राज्याच्या गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी हे आदेश दिले? जी गोष्ट घडली त्यावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का ? हा प्रश्न पडतो आहे. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर  झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते ते कधीही समोर येणार नाही. बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारुन टाकलं जात असेल तर गृहमंत्र्यांचा काही वचक राहिला आहे की नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पटोले आणि वडेट्टीवारांचे देवेंद्र फडणवीसांना सवाल

बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत असे सांगत या दोघांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच प्रश्न विचारले आहेत.

१. आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात?”

२. अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?

३. फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?

४. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *