मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड २० मिनिटे चाललेल्या या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाली, सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होती. मात्र बैठकीपूर्वीच राज आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीवर हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधून असल्याचं दिसून येते.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे राज्यात २२०-२२५ जागा लढवेल असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्याशिवाय राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्यात जात काही ठिकाणाचे उमेदवारही जाहीर केलेत.
