मुंबई : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून ठाण्यात मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच पाऊस ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे. तसेच, राज्यातील विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.